Vidhan Sabha 2019 : औरंगाबादमध्ये कॉंग्रेसला झटका, या उमेदवाराने चक्क नाकारली उमेदवारी

सचिन चोबे
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

प्रभाकर पालोदकर अपक्ष लढणार, आता कॉंग्रेसतर्फे कैसर आझाद यांना तिकीट 

विधानसभा 2019
सिल्लोड (बातमीदार) - सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडींची मालिका सुरूच असून, बुधवारी (ता. दोन) रात्री जाहीर करण्यात आलेली कॉंग्रेसची उमेदवारी प्रभाकर पालोदकर यांनी नाकारत गुरुवारी (ता. तीन) अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर कॉंग्रेसने कैसर आझाद यांना उमेदवारी दिली आहे. 

हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यानंतर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कॉंग्रेस कोणाला मैदानात उतरविते याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले होते. दरम्यान, भाजपच्या ताब्यातून शिवसेनेने मतदारसंघ काढून घेतल्यानंतर तालुक्‍यातील भाजप कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींवर नाराज होते. त्यामुळे भाजपमध्ये बंडाळी होऊन सत्तारांच्या विरोधात कोण उमेदवार रिंगणात उतरवतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु, तिथेही गटातटाचे राजकारण झाल्यामुळे बंडखोरीतही एका उमेदवारावर एकवाक्‍यता झाली नाही. शेवटी सत्तारांच्या विरोधात लढत देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांच्याशी भाजप पदाधिकाऱ्यांची बातचीत सुरू होती. कॉंग्रेसचे तिकीट नाकारून प्रभाकर पालोदकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असताना, सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे भाजप बंडखोरांच्या मदतीने प्रभाकर पालोदकर अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने रंगत वाढली आहे. भाजपचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्या निवासस्थानी पालोदकरांना पाठिंबा देण्यासाठी प्रमुख भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Sillod Constituency vidhansaha election