क्षेत्र कमी असल्याने ऊस पळवापळवीचा प्रकार?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

उमरगा, लोहारा तालुक्‍यांत ऊसतोडीला प्रारंभ झाला आहे. गाळप हंगामासाठी यंत्रणा कामाला लागली आहे; मात्र यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याने उसाच्या पळवापळवीचा प्रकार होण्याची शक्‍यता आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा, लोहारा तालुक्‍यांत ऊसतोडीला प्रारंभ झाला आहे. शिवारात मजुरांची रेलचेल सुरू झाली असून ट्रक, ट्रॅक्‍टर उसाच्या फडात दिसत आहेत. तालुक्‍यातील दोन साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून, रविवारी (ता. एक) समुद्राळच्या भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या चिमणीतून धूर बाहेर पडला आहे. यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याने उसाच्या पळवापळवीचा प्रकार होण्याची शक्‍यता आहे. मजुरांच्या टोळींचीही मनधरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी पायपीट यंदा कमी झाली आहे. 

हेही वाचा : डेस्टीनेशल वेडींगचा विचार करताय मग आता मिळेल लोन. 

कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज 
उमरगा, लोहारा तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना संजीवनी देणारा मुरूमचा विठ्ठलसाई साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. चालू गाळप हंगामासाठीची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. शिवारात ऊसतोड मजूर, वाहने दाखल झाली असून, ऊसतोड सुरू करण्यात आली आहे. समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने क्‍युनर्जी कंपनीला कारखाना भाडेतत्त्वावर दिला आहे.

हेही वाचा : डेस्टीनेशल वेडींगचा विचार करताय मग आता मिळेल लोन. 

दोन्ही साखर कारखाने ऊस गाळपासाठी सज्ज झाले असून, शिवारात ऊसतोड मजूर, वाहनांची सोय करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात पाण्याची कमतरता असल्याने उसाचे क्षेत्र कमी झाले होते. दोन्ही तालुक्‍यांत जवळपास सात हजार हेक्‍टरवरच ऊस असल्याने यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. त्यात बाहेरच्या कारखान्याचे ऊस नेण्यासाठी नियोजन सुरू आहे. तुळजापूर तालुक्‍यातील कंचेश्वर, उस्मानाबाद तालुक्‍यातील रूपमाता, कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्‍यातील भुसनूर, सोलापूर जिल्ह्यातील लोकमंगल साखर कारखान्याकडून या भागातील ऊस घेण्याचे नियोजन सुरू आहे. 

प्रतिहेक्‍टरी कमी मिळतेय उत्पादन 
गेल्या पाच-सहा महिन्यांत तालुक्‍यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे उसाला कमी पाणी मिळाल्याने सध्या तोड होणाऱ्या उसाचे प्रतिहेक्‍टरी उत्पादन पंधरा ते वीस टक्‍क्‍यांनी घटले आहे. सध्या असलेल्या सात हजार हेक्‍टरवर मिळणाऱ्या चार ते सव्वाचार लाख मेट्रिक टन उसापैकी पंधरा ते वीस टक्के ऊस लागवडीसाठी घेतला जात आहे. परतीच्या पावसाने झालेल्या सिंचनाचा फायदा उसाला होऊ शकणार असल्याने क्षेत्र वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान, यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याने साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याला उसाच्या फडापर्यंत जावे लागत आहे. ऊसतोड मजुरांची उपलब्धता सहजासहजी मिळत आहे. ऊस नेण्यासाठी कारखान्याच्या प्रशासनाला शेतकरी शोधावे लागत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Sugar factory