सुकन्या योजनेतून उघडली 55 हजार खाती

प्रकाश बनकर
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

भारतीय टपाल खात्यात सुकन्या समृद्धी योजना यशस्वी ठरली आहे.

औरंगाबाद : आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करीत पालक वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करीत असतो. याअनुषंगाने लेकीच्या नावाने होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याचे सुखद चित्र जिल्ह्यात आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक पालकांनी केली आहे. या योजनेत औरंगाबाद व जालना मुख्य टपाल कार्यालयाअंतर्गत 31 जुलैअखरेपर्यंत एकूण 55 हजार 358 सुकन्या खाती उघडण्यात आली. 

भारतीय टपाल खात्यात सुकन्या समृद्धी योजना यशस्वी ठरली आहे. टपाल विभागात लोकांनी स्वत:हून येत आपल्या मुलींच्या नावांनी खाती उघडली आहेत. टपालासह राष्ट्रीयीकृत बॅंकांतर्फे ही योजना राबविण्यात येत आहे. यात स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 2018 पर्यंत 31 हजारांवर खाती उघडली. योजना सुरू झाल्यापासून सुकन्या समृद्धीत गुंतवणुकीसाठी टपाल विभागात पालकांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

दर महिन्यात सरासरी 750 खाती उघडली जातात. त्यातून 2.50 कोटींची गुंतवणूक होत आहे. मागील मे ते जुलै या तीन महिन्यांत तब्बल 1800 वर खाती उघडण्यात आली. यातून 10 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. योजनेत आकर्षक 8.4 टक्के व्याजदर, कर सवलत असल्याने आपल्या लाडक्‍या लेकींच्या भविष्यासाठी पालकांचा खाती उघडण्याकडे कल वाढत आहे. 

अशी आहे योजना 

योजनेत पालक कन्येच्या नावाने जवळच्या कोणत्याही टपाल कार्यालयात किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते उघडू शकतात. एक पालक किंवा कायदेशीर पालक जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाती उघडू शकतो. गुंतवणुकीसाठी मुलीचे वय 10 वर्षांच्या आत हवे. मुलीचा जन्माचा दाखला व पालकाची केवायसी कागदपत्रे खाते उघडण्यासाठी आवश्‍यक आहेत; मात्र या खात्यामध्ये वारस नेमण्याची सुविधा नाही. 250 रुपये भरून खाते उघडता येते. त्यानंतर 100 च्या पटीत एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येऊ शकतात. मुलीचे वय 18 झाल्यास किंवा त्यापुढे असल्यास 50 टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम काढता येते. मुलीचे वय 21 झाल्यावर खाते बंद करता येईल. 18 व्या वर्षीच लग्न झाल्यास मुदतपूर्वसुद्धा बंद करता येते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about sukanya samriddhi yojana