तलाठी कार्यालयाऐवजी बांधले स्वच्छतागृह?

सयाजी शेळके
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील अजब प्रकार 

उस्मानाबाद : बांधायचे होते तलाठी कार्यालय; पण बांधले स्वच्छतागृह. हे ऐकून थक्क व्हाल. पण, हे सत्य असून हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील असल्याने याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात अनेक तलाठी कार्यालयांना स्वतःच्या मालकीच्या इमारती नव्हत्या. त्यामुळे आघाडी शासनाच्या काळात 2011-12 मध्ये जिल्ह्यात काही तलाठी कार्यालयांची उभारणी करण्यात आली. जागेला सोन्याचा भाव आला आहे. प्रत्येक तलाठी कार्यालयात नागरिकांच्या जागेचे महत्त्वाचे दस्तऐवज असतात. प्रत्येक तलाठी कार्यालय पक्‍क्‍या इमारतीत असावे, यासाठी जिल्ह्यात काही तलाठी कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम झाले.

शहराचे तलाठी कार्यालय पत्र्याच्या इमारतीत होते. त्यासाठीही नवीन इमारत बांधण्याचे नियोजन होते. तशी इमारतही जिल्हाधिकारी कार्यालयात बांधण्यात आली आहे. मात्र या इमारतीचा वापर चक्क स्वच्छतागृह म्हणून केला जात आहे. तर तलाठी कार्यालयाचा कारभार पत्र्याच्या इमारतीतूनच हाकला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनास्थेमुळे बांधकाम ठेकेदारांना बळ मिळत असून संबंधितांवर कारवाई करून सुसज्ज इमारती तलाठी कार्यालयासाठी वापरात याव्यात, अशी मागणी सामान्य वर्गातून होत आहे. 
 
अजब हे प्रशासन? 
एखाद्या तलाठी कार्यालयाच्या इमारतीसाठी किमान 10 ते 15 लाख रुपये खर्च होतात. अंदाजपत्रकातील अटीनुसार काम झाले की नाही, याची खातरजमा करून शासकीय अधिकाऱ्याने ठेकेदाराकडून हस्तांतरणाची प्रक्रिया करून घ्यावी लागते. हे तलाठी कार्यालय अद्यापही हस्तांतरित झालेले नाही. शिवाय पळसप (ता. उस्मानाबाद) येथील तलाठी कार्यालयही अर्धवट अवस्थेत असल्याने हस्तांतरित करून घेतले नाही. मात्र अशा अर्धवट कार्यालयातच कारभार हाकला जात आहे. शासनाच्या पैशाची अशी उधळपट्टी का होते? जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जर असा प्रकार होत असेल तर जिल्ह्यात अन्यत्र काय होत असेल, हे सांगायला नको. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असा प्रकार घडला असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रशासनाच्या कारभारावर आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सामान्यवर्गातून केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Talathi office