घागरी, हांडे, पातेलं दुरुस्त करा हो...

प्रशांत बर्दापूरकर
सोमवार, 30 जुलै 2018

वयोवृद्धपणामुळे आवाज निघत नाही, तरीही हातावरचे पोट असल्याने हलक्या आवाजात घागरी, हांडे, पातेलं दुरुस्त करा हो... असे म्हणत तांबटकरी शेख हुसेन (वय 80) महिनाभरापासून शहरात दारोदारी फिरताना दिसत आहेत. मिळेल त्या कामावर आपला उदरनिर्वाह करतात.

अंबाजोगाई - वयोवृद्धपणामुळे आवाज निघत नाही, तरीही हातावरचे पोट असल्याने हलक्या आवाजात घागरी, हांडे, पातेलं दुरुस्त करा हो... असे म्हणत तांबटकरी शेख हुसेन (वय 80) महिनाभरापासून शहरात दारोदारी फिरताना दिसत आहेत. मिळेल त्या कामावर आपला उदरनिर्वाह करतात.

पूर्वी प्रत्येक गावच्या वेशी बाहेर किंवा रस्त्याच्या कडेला तांबटकरी तांब्याच्या घागरी दुरुस्त करून देण्याचा व्यवसाय करायचे. अलीकडे या व्यवसायाचे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही काही ठिकाणी हे परंपरागत व्यवसाय सुरु आहेत. 

मुरुड (जि. लातूर) येथील शेख हुसेन हे आपल्या वयाच्या दहा वर्षापासून हा पारंपारिक व्यवसाय करत आहेत. लग्नानंतर त्यांना 5 मुली झाल्या, याच व्यवसायावर कुटूंब चालवत सर्व मुलींची लग्न त्यांनी केली. मोठ्या मुलीचा आधार असतो, परंतु आपलं पोट भागविण्यासाठी आपणच होईल तोपर्यंत कष्ट केले पाहिजेत म्हणून ते या उतार वयातही घागरी ठोकुन दुरुस्तीचे काम करतात. 

या युगात कमी वेळेत, कमी कष्टात काम कसे होईल याकडे अनेकांचा ओढा असतो. शेख हुसेन यांच्या कष्टाकडे पाहिल्यास त्यांची या वयातही कामावरची निष्ठा समाजापुढे आदर्शच म्हणावी लागेल. 

डोक्यावर ओझे
तांबटकरी, शिकलकरी कुठे तरी पाल ठोकून, त्या ठिकाणी आपला व्यवसाय करतात. परंतु, शेख हुसेन मात्र मुक्कामापुरते पाल ठोकुन दारोदारी जावून आपला व्यवसाय करतात. साठी व सत्तरी सरली आता 80 च्या वयातही डोक्यावर साहित्याचे ओझे घेऊन ते दारोदारी फिरतात. हे साहित्य कुठले तर त्यात दुरुस्तीसाठी लागणारी पक्कड, कात्री, पहार (टामी),  जोड व झाळ देण्यास लागणारे पत्रे, कथील (धातू), भाता असे 20 किलो वजनाचे साहित्य त्यांच्या डोक्यावर असते. 

एका गल्लीत फिरले तर एखादे काम मिळते. प्लास्टिक व स्टिलमुळे आता तांबे, पितळ, जर्मनची भांडे वापरात दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. एखाद्याकडेच असे जुने भांडे असतील तरच हे काम मिळते. त्यामुळे, दिवसभरात कधी 100 तर कधी 300 रुपये मजुरी मिळते. काम करताना काही तुटले, फुटले किंवा जोड व्वस्थित न बसल्यास ग्राहकांचे बोलणेही खावे लागतात. 50 रुपये मजुरी मागितली तरी त्यात घासागिस करणारे ग्राहक असतात. परंतु त्याला कष्ट किती लागतात याचे मोल कोणीच करत नाहीत. अशी व्यथाही शेख हुसेन यांनी सांगितली. काहींना दया येते परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पैसे देऊन एकवेळचे जेवण व चहापाणी करणारेही आहेत. अशा काही जणांमुळेच या जगात माणुसकी शिल्लक आहे. या माणुसकीच्या बळावरच आपण या वयातही हे काम करतो असेही त्यांनी सांगितले.

भात्यावरचा हात थांबेल का
ऊन, पावसाची तमा न बाळगता शेख हुसेन या वयातही भाता घेऊन दारोदार फिरतात. जिथे काम मिळेल तिथे आपल्या डोक्यावरचा भाता खाली टेकवायचा अन् काम सुरू करायचे. त्यांचा या भात्यावरचा हात कधी थांबेल याची चिंता ना शासनाला ना या व्यवस्थेला. शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु त्या अशा शेख हुसेन पर्यंत का पोचू शकत नाहीत. याचा अर्थ योजनांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नाही असाच घ्यायचा का असे प्रश्न निर्माण होतात.

Web Title: news about tambatkari community shaikh hussain