औरंगाबादच्या संत तुकाराम नाट्यगृहाला लावले कुलूप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम कासवगतीने सुरू असून, शहराच्या सांस्कृतिक चळवळीला धक्‍का लावण्याचे काम महापालिका करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद - शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या संत तुकाराम सिडको नाट्यगृहाची महापालिकेने अवघ्या 11 वर्षांत वाट लावली आहे. तुटलेल्या खुर्च्या, सीलिंग कोसळत असल्यामुळे नाट्यगृह कुलूपबंद करण्यात आले असून, तीन महिन्यांनंतरही खासगीकरणाच्या निविदेची प्रक्रिया सुरूच आहे. दुसरीकडे संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम कासवगतीने सुरू असून, शहराच्या सांस्कृतिक चळवळीला धक्‍का लावण्याचे काम महापालिका करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. 

सिडको-हडको भागाची गरज लक्षात घेऊन सिडको प्रशासनाने भव्य नाट्यगृहाची उभारणी केली. 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते नाट्यगृहाचे लोकार्पण झाले होते. त्यावेळी मुंबईत नव्हते असे सुसज्ज भव्यदिव्य नाट्यगृह शहरात उभारण्यात आल्यामुळे मोठा गवगवा झाला; मात्र लोकार्पणानंतर विलासराव देशमुख यांनी नाट्यगृह महापालिकेकडे वर्ग करू नका, महापालिका नाट्यगृहाची वाट लावेल, ते सिडकोमार्फतच चालविण्यात यावे, अशी भूमिका घेतली होती. विलासरावांनी त्यावेळी व्यक्त केलेली भीती दुर्दैवाने खरीच ठरली आहे. अवघ्या 11 वर्षांत सिडको नाट्यगृहाचे महापालिकेने बारा वाजविले आहेत. अनेक वर्षांपासून नाट्यगृहासमोरील कारंजे बंद आहेत. हॉलमधील सुमारे तीनशे खुर्च्यांची मोडतोड झाली आहे. स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत वाईट आहे. एसी काम करीत नसल्याने नाट्यगृह भाड्याने घेणाऱ्यांवर पश्‍चात्तापाची वेळ येत आहे. त्यात 20 जुलैला नाट्यगृहाबाहेरील मोकळ्या जागेचे सीलिंग कोसळल्यानंतर नाट्यगृहच बंद करण्यात आले. 15 जूनला नाट्यगृहात शेवटचा कार्यक्रम झाल्यानंतर कुलूप लावण्यात आले आहे. 
 
खासगीकरणासाठी लावली वाट 
नाट्यगृह महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यापासून महापालिकेचे खासगीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देखभाल-दुरुस्तीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले. नाट्यगृह तोट्यात असल्याचे वारंवार अधिकारी-पदाधिकारी सांगत असले, तरी वर्षाला नेमका किती तोटा होतो, याची आकडेवारी देखील महापालिकेकडे नाही. त्यामुळे नाट्यगृहाचे खासगीकरण करण्यासाठीच दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. 
 
संत एकनाथ रंगमंदिराचे भिजत घोंगडे 
एकीकडे सिडको नाट्यगृहाची वाताहत झालेली असताना दुसरीकडे संत एकनाथ रंग मंदिराच्या दुरुस्तीचे काम वर्षभरापासून सुरूच आहे. एक-एक काम वाढविले जात असून, किती दिवसांत नूतनीकरणाचे काम संपेल याची शाश्‍वती देण्यास कोणीच तयार नाही. त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे. 
 
महापौर विसरले स्वतःची भूमिका 
महापौरपदी विराजमान झाल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सिडको नाट्यगृहाची पाहणी करीत शहरातील सांस्कृतिक चळवळीसाठी दर्जेदार नाट्यगृहाची आवश्‍यकता आहे, असे वक्तव्य केले होते; मात्र दर्जेदार सोडा, आहेत ते नाट्यगृह बंद करून सांस्कृतिक चळवळीची वाट लावण्यात आली आहे. 
 
 

नाट्यगृहाची वैशिष्ट्ये 

 • 5342 चौरस मीटरचे बांधकाम असलेले सभागृह, मल्टिपर्पज हॉल आणि सुविधा. 
 • औरंगाबाद शहरातील सर्वांत मोठे नाट्यगृह 
 • आसन क्षमता एक हजार 212. (खालचा मजला ः नऊशे, बाल्कनी ः 312) 
 • नाट्यगृहात सेंट्रलाइज एसीची सुविधा. 
 • प्रवेशाची गॅलरी 230 चौरस मीटर. 
 • प्रदर्शन सभागृहाचा भाग 530 चौरस मीटर. 
 • मल्टिपर्पज हॉलची क्षमता ः अडीचशे प्रेक्षक. 
 • कलावंतांसाठी तीन ग्रीन रूम. 
 • अत्याधुनिक ध्वनी आणि प्रकाश यंत्रणा. 
 • भूकंपरोधक रचना असलेले बांधकाम. 
 • 68 मोटारी आणि 220 दुचाकींचे पार्किंग. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Theater repair