होऊ दे जरासा उशीर... जगणे अजून बाकी आहे! 

सिग्नलवर झालेली गर्दी
सिग्नलवर झालेली गर्दी

औरंगाबाद - घाई-गडबड आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हीच अपघाताची मुख्य कारणे आहेत; पण बीड बायपासवरचे अनेक वाहनधारक याचे भान ठेवत नाहीत.
हा रस्ता म्हणजे मृत्युमार्गच. असे असताना या मार्गावर आयुष्य धोक्‍यात घालून पादचारी चक्क मोबाईलमध्ये डोळे खुपसून; तर काही वाहनधारक कानाला फोन किंवा एअरफोन लावून मार्गक्रमण करीत असल्याचे चित्र मंगळवारी (ता. 12) होते. त्यामुळे अपघात टाळायचा असेल तर होऊ दे जरासा उशीर.. जगणे अजून बाकी आहे असे स्वतःच स्वतःला सांगत वाहनधारकांनी नियम पाळणे आवश्‍यक झाले आहे. 

या रस्त्यावरील अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधींनी मंगळवारी दुपारी एकनंतर पूर्ण रस्ता दुचाकीने आणि काही अंतर पायी चालून कापला. महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौकदरम्यान वाहनांच्या लांबवर रांगा, कर्णकर्कश जडवाहनांची गर्दी, त्यांच्या सलग वाहतुकीमुळे समोरची बाजूही दिसत नव्हती. त्यातच वेडेवाकडे वळण घेऊन, नियम मोडीत पळणाऱ्या काही दुचाकी, रस्त्याच्या कडेला उतरलेली छोटी वाहने अन्‌ वाहनांच्या रांगा कधी संपतात, याची वाट पाहणारे पादचारी दिसले. यात मागून पुढे जाणारा कुणी दुचाकीचालक फोनवर बोलत होता; तर पायी जाणार एक जण मोबाईलमध्ये डोळे खुपसून चालत होता. एक विनाहेल्मेट दुचाकीस्वार तरुणी तर एअरफोनवर बोलत सुसाट निघाली होती. सिग्नलवर थांबलेल्या एका दुचाकीस्वार तरुणाला मोबाईलवर बोलताना सिग्नल कधी ग्रीन झाले याचेही भान नव्हते. एक ज्येष्ठ नागरिकही महामार्गाने चालत-चालत फोनवर बोलत होता. यात ट्रकचालकही मागे नव्हते. एक ट्रकचालकाचा स्टेअरिंगवर एक हात; तर दुसऱ्या हातने कानाला मोबाईल लावलेला होता. वाहनाच्या लांबच लांब रांगेत वाहतूक पोलिसांचे इशारेही दिसत नव्हते. पुढचा गेला म्हणून आपण जायचे असे अंदाजाने वाहनधारक पुढे-पुढे सरकत होते. हे सगळे पाहून काळजाची धडधड वाढत होती. 
-- 
एकाच दुचाकीवर चार ते पाच    
एका दुचाकीवर पाच जणांचे एक अख्खं कुटुंब जाताना दिसले. काही दुचाकीवर नवराबायकोसह दोन मुलेही होते. ट्रिपलसीट दुचाकीस्वारांमध्ये तरुणांची संख्या अधिक होती. त्यातील
काही दुचाकीचालकांनी हेल्मेट घातलेले होते; पण दुर्दैवाने अपघात झाला तर नक्कीच मागे बसलेल्याला गंभीर इजा होईल, ही कल्पनाच काळजाला चर्र करून गेली. 
 
जरा इकडेही लक्ष द्या! 
अपघात झाला, की आपण धोकादायक रस्ता, कुचकामी प्रशासन असे म्हणत खापर फोडून मोकळे होतो. त्यात काही अंशी तथ्यही आहे; परंतु छोटी वाहने आणि दुचाकीस्वारांची नडलेली
घाई, त्यांची नियम मोडून धावण्याची पद्धती व अक्षम्य चुका या बाबीही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत, हे यातून दिसून आले. 
 
जाणीव ठेवा.. 
अपघातात केवळ एका व्यक्तीचाच जीव जातो किंवा एकाच व्यक्तीला अपंगत्व येते असे नाही; तर ज्यांचा अपघात झाला त्यांचे सर्व कुटुंबच अपघाताने उद्‌ध्वस्त होते. कर्त्या व्यक्तीचामृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर तिच्यावर अवलंबून असलेल्या सर्वांवर आघात होतो. त्यामुळे वाहन चालविताना घरी दोन डोळे वाट पाहत दारावर खिळलेले आहेत, याची जाणीव ठेवून नियम पाळणे गरजेचे आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com