भाविकांना सुविधा देण्यावर भर द्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

दीपा मुधोळ-मुंडे यांच्या विविध विभागांना सूचना 

उस्मानाबाद : नवरात्र महोत्सवात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यांना सुलभरीत्या दर्शन मिळावे, यासाठी विविध विभागांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले.

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर संस्थानच्या प्रशासन कार्यालयात शनिवारी (ता. 21) बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे बोलत होत्या. प्रभारी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, उपविभागीय अधिकारी (महसूल) रामेश्वर रोडगे, मंदिर संस्थानच्या व्यवस्थाप व तहसीलदार योगिता कोल्हे, आपत्ती विभागाच्या व्यवस्थापक वृषाली तेलोरे, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोडो, तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या, की नवरात्र महोत्सवात राज्यासह परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी तुळजापूरला येतात. त्यांच्या सोयीसाठी सुरक्षा यंत्रणांसह सर्व संबंधित विभागांनी योग्य नियोजन करावे. पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, स्वच्छता, आरोग्यसेवा, रुग्णवाहिका, वाहनतळ, अग्निशमन वाहन, वीजपुरवठा आदी बाबींचे नियोजन करावे. महोत्सवाच्या कालावधीत रस्त्यावर होणारी अतिक्रमणे तत्काळ काढावीत. प्रसादातील पदार्थ, पेढ्यांसह सर्व प्रकारच्या अन्नाच्या नमुन्यांची वेळोवेळी तपासणी करावी. कुंकवाचे नमुने घेऊन भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करावी. वैध मापन व अन्न व औषधी प्रशासन विभागाने संयुक्तपणे काम करावे. 

विभागनिहाय आढावा 
भाविकांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाने विशेष गाड्यांची सोय करून त्याबाबतच्या सूचना ध्वनिक्षेपणाद्वारे वेळोवेळी द्याव्यात. पोलिस विभागाने महोत्सवाच्या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना त्यांनी केल्या. पार्किंग, एसटी महामंडळ, आरोग्य विभाग, नगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, महावितरण आदी विभागांनी केलेल्या नियोजनाचा मुधोळ-मुंडे यांनी आढावा घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Tuljapur