तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रा सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रा रविवारी (ता. 22) रात्री साडेसातच्या सुमारास सुरू झाली. 

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रा रविवारी (ता. 22) रात्री साडेसातच्या सुमारास सुरू झाली. तुळजाभवानी मातेची नवरात्रापूर्वी घोर निद्रा असते. तुळजाभवानी मातेची प्रत्यक्ष मूर्ती सिंहासनावरून शेजघरात विश्रांतीसाठी नवरात्रापूर्वी सात दिवस असते. दरम्यान, देवीच्या गादीसाठी तुळजाभवानी मंदिरात आज सकाळी साडेसहापासून महिलांनी कापूस निवडला.

तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात महिला, आराधिनींनी आज गळ्यात कवड्यांची माळ, तसेच हातामध्ये परडी घेऊन तुळजाभवानी मातेच्या गादीसाठी कापूस निवडला. पलंगे घराण्यातील सदस्यांनी मंदिरातील शेजघरात देवीचा पलंग स्वच्छ करून घेतला. गादीचा कापूस पिंजण्याचे काम शम्मू बाशुबाई पिंजारी यांनी केले. तर गादीमध्ये स्वच्छ कापूस भरण्याचे काम अच्युत कुलकर्णी यांनी केले. गादी शिवण्याचे काम जनार्दन निकते, मंगेश निकते, रवी निकते, प्रणव निकते यांनी केले. मंदिरात महिलांनी दिवसभर गादीचा कापूस निवडण्यासाठी गर्दी केली होती. कापूस निवडताना महिला विविध गीते, तसेच आराधी गीते गात देवीची स्तुती कवनांमधून करीत होत्या. 

तुळजाभवानी मातेचा सायंकाळचा अभिषेक झाल्यानंतर देवीस कणकीपासून तयार केलेल्या दिव्यांनी ओवाळण्यात आले. पानांचा विडा आदींसह वेगवेगळ्या वस्तू देवीस ओवाळताना भोपे मंडळींच्या ताटात असतात. देवीच्या मूर्तीवर भंडारा अर्पण केल्यानंतर तुळजाभवानी मातेची मूर्ती शेजघरात विश्रांतीसाठी रात्री साडेसातच्या सुमारास आणण्यात आली. 29 सप्टेंबरच्या रविवारी पहाटेपर्यंत देवीची मूर्ती शेजघरात विश्रांतीसाठी असणार आहे. या कालावधीत तुळजाभवानी मातेच्या मूर्तीस सकाळी व सायंकाळी अभिषेकाच्या वेळी सुगंधी तेल लावण्यात येते. 

तुळजाभवानी मातेच्या गादीचा कापूस निवडण्यासाठी मी परंपरेने येते. देवीच्या मंदिरात सेवेसाठी ही अनमोल संधी असते. 
- प्रमिला गुरव 
तुळजाभवानी मातेच्या पलंगाची स्वच्छता आमचे पलंगे घराणे पिढ्यानपिढ्यांपासून करीत आहोत. याच पलंगावर तुळजाभवानी मातेची विश्रांती असते. 
- बब्रुवान पलंगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Tuljapur