तुळजापूरची बाजारपेठ होतेय सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

तुळजाभवानी मातेच्या 29 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या 29 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. बाजारपेठही कात टाकत असून व्यावसायिक सज्ज होत आहते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे नवरात्र ज्योतीचा ओघ यंदा वाढण्याची शक्‍यता आहे.

नवरात्रात व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाची तयारी करावी लागते. त्यामध्ये कापड, किराणा, प्रासादिक वस्तू, वेळूपासून तयार करण्यात येणाऱ्या परड्या, कवड्याच्या माळा, हॉटेल, लॉज आदी व्यवसाय भाविकांवर अवलंबून आहेत. खासगी वाहनचालकांचा व्यवसायही या काळात वाढतो. तुळजापूरची यात्रा 15 दिवस चालणार असल्याने वेगवेगळ्या टप्प्यांत भाविकांचा ओघ राहणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली आहे. दुकान जागेचे ठराव, मालाची खरेदी आदी कामे सुरू आहेत.

शहरात दुकानाच्या जागेची भाडेवाढ संमिश्र प्रमाणावर आहे. काही ठिकाणी पाच टक्के आणि दहा टक्के भाडेवाढ झाली आहे. मात्र, किसान चौकी ते आर्य चौक ते हुतात्मा स्मारकदरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास अनेक दुकानदारांना जागा सोडावी लागणार आहे. काहींनी जागा सोडल्याही आहेत. 

इंधनाचा प्रश्‍न 
नवरात्रात अनेक भाविक स्वतः स्वयंपाक करून तुळजाभवानी मातेस नैवेद्य नेतात. त्यांना गॅस मिळणे अशक्‍य असते. इंधन म्हणून रॉकेलचा वापर भाविक करतात. मात्र, रॉकेल जवळपास मिळतच नाही. त्यामुळे लाकडाची चूल हाच आधार ठरत आहे. अन्य तीर्थक्षेत्रांच्या यात्राकाळात इंधनाची सोय प्रशासनाकडून केली जाते, ती तुळजापूरमध्ये होत नाही. 

व्यापाऱ्यांनी नवरात्राची तयारी सुरू केली आहे. नवरात्राच्या तिसऱ्या माळेपर्यंत किती भाविक येतात, यावर यात्राकाळात एकूण येणाऱ्या भाविकांचा अंदाज कळू शकेल. 
- बाळासाहेब पुजारी, व्यापारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Tuljapur