नवरात्रोत्सवासाठी तुळजापूरनगरी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवासाठी तुळजापूरनगरी सज्ज झाली आहे.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवासाठी तुळजापूरनगरी सज्ज झाली आहे. रविवारी (ता. 29) दुपारी बाराला मंदिरात घटस्थापना होईल. त्यानंतर रोज विविध धार्मिक व अन्य कार्यक्रमांची पर्वणी असेल.

शहरासह तुळजाभवानी मंदिरात नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे. तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता पूर्ण झाली आहे. मंदिरात शेजघरातील निद्रिस्त मूर्ती शनिवारी (ता. 28) मध्यरात्रीनंतर एकला सिंहासनावर अधिष्ठित करण्यात येईल. त्यानंतर देवीचे नित्य अभिषेक होतील. पहाटे सहाला नित्य अभिषेक झाल्यानंतर दुपारी बाराला घटस्थापना होईल. 

मंदिरात भाविकांना आजपासून घाटशीळमार्गे प्रवेश देण्यास सुरवात झाली आहे. महाद्वारातून प्रवेश आता बंद करण्यात आला आहे. घाटशीळ मार्गावर दर्शन पासचे 27 काउंटर सुरू करण्यात आले आहेत. घाटशीळ रस्त्यावर दर्शन मंडपाच्या शेडजवळ क्‍लॉक रूम, पाणपोयी, प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आजच दाखल झाले आहेत. पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. 
तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव पंधरा दिवसांचा असतो. सहा ऑक्‍टोबरला दुर्गाष्टमी, सातला महानवमी, आठला तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन, तेराला कोजागरी पौर्णिमा हे यात्रेतील महत्त्वाचे दिवस आहेत. नवरात्रोत्सवात रोज अभिषेक, पूजा, आरती, छबिना मिरवणुकीसह विशेष पूजाही बांधल्या जातील. 

प्रक्षाळ पूजेसाठी असा प्रवेश 
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत प्रक्षाळ पूजेसाठी स्थानिक नागरिकांना आधारकार्ड दाखवून राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे, असे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Tuljapur