चांदीच्या पुरातन वस्तू अन्‌ पूजेचा थाट!

तुळजाभवानीमाता मंदिरातील फुलपात्र.
तुळजाभवानीमाता मंदिरातील फुलपात्र.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या नित्यपूजेसाठी अनेक प्राचीन, तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या चांदीच्या वस्तू आहेत. भाविकांना या वस्तूंची सहसा माहिती होत नसली तरी वेगळेपण दर्शविणाऱ्या या वस्तू पूजेच्या तयारीचा थाट वाढवितात. 


तुळजाभवानी मातेच्या मंदिरात वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने आहेत, त्याचप्रमाणे चांदीच्या अनेक वस्तू आहेत. तुळजाभवानीमातेस सकाळी आणि सायंकाळी मस्तकास गंधलेपन होते. त्यासाठी चांदीची गंधाणी आहे. चांदीचे फुलपात्र, तांब्या याशिवाय मूर्तीवर अभिषेक घालण्यासाठी चांदीची गुंडी (घागर) आहे. पंचारती, धुपारती, चांदीचे अंगारा पात्र आहे. राजदंडाप्रमाणे चांदीची काठी; तसेच सोन्याची काठीही आहे. या काठीस चोपदार काठी असे म्हटले जाते. तुळजाभवानी मातेच्या दररोजच्या पूजेवेळी चोपदार काठी सोबत असते. चांदीच्या या वस्तूंशिवाय चांदीची मोठी घागर, चांदीचा मायाप्रताप (मायमोरताब) आहे. मायाप्रताप हे तुळजाभवानीमातेचे मायावी रूप आहे. मायाप्रताप नवरात्रात पाचव्या माळेपासून दुर्गाष्टमीच्या छबिना मिरवणुकीत रात्री सहभागी असते. पुरातन तसेच काही अलीकडच्या काळातील चांदीच्या वस्तूंचा दररोज पूजेसाठी सहभाग असतो. मंदिरात पूजा मांडण्यासाठी काही चांदीच्या वस्तू आहेत. त्यामध्ये ब्रह्मदेवाची चांदीची मूर्ती, चांदीचे दोन सिंह, छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती, त्रिशूल आदींसह विविध वस्तू आहेत.

चांदीच्या अनेक वस्तू प्राचीन आहेत. नित्यपूजेवेळी आणि नवरात्रोत्सवात त्यांचा रोज वापर होतो. या साऱ्या वस्तू वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या ठेवणीच्या आहेत. महंत, प्रशासन यांच्या निगराणीखाली या वस्तू दररोज काढण्यात येतात आणि पूजा झाल्यानंतर त्या विशिष्ट ठिकाणी ठेवल्या जातात. 

राजदरबाराप्रमाणे कारभार 
तुळजाभवानीमातेचा कारभार राजदरबाराप्रमाणे चालतो. तुळजाभवानीमातेच्या पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक वस्तू वैविध्यपूर्ण आहेत. नवरात्रात अनेक प्राचीन वस्तू नित्योपचार पूजेसाठी वापरल्या जातात. 

तुळजाभवानी मंदिरात नित्यपूजेसाठी अनेक वस्तू महत्त्वाच्या आहेत. दररोज सकाळी आणि सायंकाळी मूर्तीच्या मस्तकी गंधलेपन होते. त्यासाठी चांदीची गंधाणी आहे. नवरात्रात पाचव्या माळेपासून छबिन्याच्या वेळेस चांदीची मायमोरताब सहभागी असते. रात्रीच्या पूजेवेळी चांदीची घागर असते. वेगवेगळ्या अवतार पूजेसाठी चांदीच्या वस्तू आहेत. 
- दिलीप नाईकवाडी, माजी धार्मिक व्यवस्थापक, तुळजाभवानी मंदिर समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com