अजाबळीनंतर घटोत्थापन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

तुळजाभवानीमाता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम 

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या नवरात्रात झालेल्या नऊ दिवसांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर सोमवारी (ता. सात) घटोत्थापन झाले. तत्पूर्वी मंदिरातील होमकुंडावर अजाबळी अर्पण करण्यात आला.

तुळजाभवानी मंदिरात सकाळी नित्य अभिषेक झाले. यावेळी मुख्य भोपे पुजारी सचिन संभाजीराव पाटील यांनी तुळजाभवानी मातेची पूजा तसेच सर्व धार्मिक विधी केले. तालुक्‍यातील सिंदफळ येथून बंडगर घराण्यातर्फे अजाबळी सवाद्य मिरवणुकीने सकाळी दहाला तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आला. मंदिर परिसरात अजाबळीची मिरवणूक काढण्यात आली. अजाबळीस होमकुंडावर पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून पाणी पाजण्यात आले. त्यानंतर होमकुंडाच्या पायथ्याशी असणाऱ्या रक्तभैरवाची पूजा केल्यानंतर तहसील कार्यालयाचा शिपाई जीवन वाघमारे यांच्या हस्ते अजाबळी देण्यात आला. अजाबळीनंतर घटोत्थापन झाले. बंडगर कुटुंबीयांना भरपेहराव आहेर करण्यात आला. त्यानंतर तुळजाभवानी मंदिरातील उपदैवत असलेल्या येमाई, खंडोबा मंदिरात घटोत्थापन झाले. अंगारा मिरवणूकही झाली.

मंदिर समितीच्या सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंखे, पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, विपीन शिंदे, नागेश साळुंके, अविनाश गंगणे, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, अतुल मलबा, विकास मलबा आदी उपस्थित होते. 

प्रक्षाळ पूजा, नैवेद्य 
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दुर्गाष्टमीच्या दिवशीची प्रक्षाळ पूजा रविवारी (ता. सहा) झाली. महंतांच्या हस्ते तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात पाण्याचे कलश अर्पण करण्यात आले. त्यानंतर देवीस रात्रीचे नैवेद्य दाखविण्यात आले. दुर्गाष्टमीच्या त्रीच्या नैवेद्यातील सर्व पदार्थ महंतांना अर्पण असतात.
कुंकुमार्चन कार्यक्रम 
तुळजापूर ः तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त येथील विठ्ठल मंदिरात दुर्गाष्टमीनिमित्त रविवारी (ता. सहा) कुंकुमार्चन कार्यक्रम झाला. 
दुपारी दोन ते सायंकाळी पाचपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात सुमारे 90 महिलांनी सहभाग घेतला. दीपादेवी बुरांडे, उमादेवी काकडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. वैभवशास्त्री कुलकर्णी (बल्लाळ चिंचोली, जि. लातूर) यांनी मार्गदर्शन व पौरोहित्य केले. 
आज सीमोल्लघंन 
तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन मंगळवारी (ता. आठ) पहाटे सहाच्या सुमारास होणार आहे. दरम्यान, नगर येथील पलंग पालखीचे सोमवारी सायंकाळी शहरात आगमन झाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Tuljapur