कुंकवाची उधळण अन्‌ संबळचा ठेका

तुळजापूर ः तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यात सहभागी झालेले भाविक.
तुळजापूर ः तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यात सहभागी झालेले भाविक.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः कुंकवाची उधळण, संबळाचा कडकडाट आणि "आई राजा- उदो उदो'च्या जयघोषात तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा मंगळवारी (ता. आठ) उत्साहात झाला.


तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा शौर्याचे प्रतीक आहे. सोहळ्यापूर्वी सोमवारी (ता. सात) रात्रीपासून तुळजाभवानीमातेचे मंदिर प्रथेनुसार खुले ठेवण्यात आले होते. नगर येथून आलेला पलंग, पालखीच्या मिरवणुकीसाठी शहर रात्रभर जागे होते. सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास देवीचे अभिषेक सुरू झाले. महानवमीचे रात्रीचे अभिषेक मध्यरात्री बाराच्या सुमारास करण्याची परंपरा असून दोनपर्यंत ते सुरू होते. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मूर्तीस 108 साड्यांचे दिंड बांधण्यास सुरवात झाली. दरम्यान, मंदिर संस्थानतर्फे पालखी आणि पलंगास सीमोल्लंघनासाठी शुक्रवारपेठेतील पालखीच्या स्थळाजवळ जाऊन निमंत्रण देण्यात आले.

 
सीमोल्लंघन सोहळ्यात अग्रभागी सुमारे 125 गोंधळी संबळाचा कडकडाट करीत होते. मायमोरताब हातामध्ये घेऊन परंपरेने पालखी मंदिरात आणली. पलंग-पालखी घेऊन येणारे मानकरी सवाद्य मिरवणुकीने मंदिराकडे निघाले. रात्री साडेबाराला निघालेली मिरवणूक विविध मार्गांनी पहाटे चारला मंदिरात पोचली. ती सीमोल्लंघन पारावर आल्यावर पालखीमध्ये गादी, मखमली आच्छादन टाकण्यात आले. पहाटे साडेपाचच्या सुमारास धुपारती झाली. त्यानंतर गाभाऱ्यातून प्रत्यक्ष मूर्ती कडीच्या दरवाज्यातून बाहेर आणण्यात आली. पालखीमध्ये तुळजाभवानी मातेची मूर्ती बसवून प्रदक्षिणा झाली. सीमोल्लघंन पारावर पालखी आल्यानंतर विविध पदार्थांचे नैवेद्य दाखवून ओवाळणी झाली. त्यानंतर मूर्ती पालखीतून सिंहाच्या गाभाऱ्यात घेऊन गेल्यानंतर तेथे देवीचे दिंड काढण्यात आले. अश्विन शुद्ध दशमीचे चरणतीर्थ झाले. सीमोल्लंघनानंतर पालखी मानकऱ्यांचा मंदिर समितीच्या अध्यक्ष व जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते सत्कार झाला. मंदिराच्या सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, माजी धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी आदी उपस्थित होते. सीमोल्लघंन सोहळ्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सचिन अमृतराव आदी उपस्थित होते. मंदिरातील सीमोल्लंघन उत्सवास महंत चिलोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजीबुवा आदी उपस्थित होते. मंदिरात आणलेली पालखी सीमोल्लंघनानंतर होमकुंडात अर्पण करण्यात आली. 

दूध, पेंड-भाकरीचा नैवेद्य 
तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघनात कुंकू- हळद, पुष्प पाकळ्यांची उधळण झाली. मंदिरात पहाटे पाचला सरकारी आरतीचे आणि नैवेद्याचे सवाद्य मिरवणुकीने आगमन झाले. दीक्षित घराण्याच्या वतीने दत्तात्रय दीक्षित, गणेश दीक्षित, बाळकृष्ण दीक्षित यांच्याकडून दुधाचा नैवेद्य सीमोल्लंघनानंतर दाखविण्यात आला. राजाभाऊ गायकवाड गोंधळी यांच्यासह गोंधळी मंडळींनी संबळ रणवाद्याने पालखी मिरवणूक, सीमोल्लंघनात सहभाग नोंदविला. पेंड भाकरीचा नैवेद्यही भगत कुटुंबीयांच्या वतीने सकाळी दाखविण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com