सौर ऊर्जेवर नवीन 38 गावांत पाणीपुरवठा 

सौर ऊर्जेवर नवीन 38 गावांत पाणीपुरवठा 

औरंगाबाद - भारनियमन असल्याने नळाला पाणी नाही म्हणून वाट पाहत बसण्याचे किंवा ग्रामपंचायतीचे वीजबिल थकल्याने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा कट झाला असे प्रकार सौरऊर्जा पंपामुळे कमी होणार आहेत. सध्या जिल्ह्यात 69 पाणीपुरवठा योजनांवर सौर ऊर्जा पंप बसविण्यात आले आहेत, तर आणखी 38 वाड्या- वस्त्यांमध्ये सौर ऊर्जा पंप बसविण्यात येणार असून याला मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 2018-19 च्या मंजूर आराखड्यात 38 गावांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित लघू नळ पाणीपुरवठा योजनेच्या आराखड्याला राज्यस्तरीय योजना मंजुरी समितीने मान्यता दिली आहे. राज्य समितीच्या मंजुरीनंतर जिल्हा परिषद स्तरावरील समितीच्या अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी 38 गावांच्या सौर ऊर्जा पंपांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. औरंगाबाद तालुक्‍यातील घारदोन, सुंदरवाडी. पैठण तालुक्‍यातील दिनापूर, धनगाव, पारुंडी तांडा, बन्नीतांडा. गंगापूर तालुक्‍यातील पोटूळ, मालूंजा बुद्रुक, कोळघर, कनकोरी, तांदूळवाडी, नेवरगाव, खोपेश्‍वर. वैजापूर तालुक्‍यातील झोलेगाव, बाहेगाव, भोकरगाव, पारळा, पालखेड, आघूर, पानवी खुर्द, भिवगाव, बोरसर. कन्नड तालुक्‍यातील केसापूर, अंतापूर, बनशेंद्रा, सिरजापूर, कोळवाडी, नावडी, मकरणपूर, देवगाव रंगारी, सासेगाव, शिरोडी, आडगाव जेहूर, वाकी, बेलखेडा. फुलंब्री तालुक्‍यातील शिरोडी खुर्द, किनगाव व वाकोद या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेला सौर ऊर्जा पंप बसविण्यात येणार आहेत. या कामांवर 1 कोटी 93 लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. 
 

चोवीस तास पाणीपुरवठा 
सध्या टंचाईच्या काळात भूजलस्तर खाली गेला असला तरी सौर ऊर्जा पंपाची क्षमता 57 मीटरपर्यंतच्या भूजलाचा उपसा करण्याची क्षमता असल्याने सौर पंप बसविण्यात आलेल्या ठिकाणी पाणीटंचाई जाणवणार नाही. याशिवाय सौरपंप बसविल्यानंतर पाच वर्षे हे पंप बसविणारी कंपनीच देखभाल दुरुस्ती करणार असल्याने ग्रामपंचायतीला कोणताही खर्च राहणार नाही आणि याशिवाय वीजबिल भरावे लागणार नाही. वीजबिल थकले म्हणून पाण्यावाचून लोकांना राहावे लागणार नसल्याचे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com