एक लाख 15 हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेचे पाणी जिल्ह्यात येत्या चार वर्षांत आणल्याशिवाय शांत बसणार नाही. कृष्णा पाणी तंटा लवादाने सात टीएमसी पाणी मिळण्यासाठी मान्यता दिली असून, योजनेअंतर्गत काम वेगाने सुरू आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेचे पाणी जिल्ह्यात येत्या चार वर्षांत आणल्याशिवाय शांत बसणार नाही. कृष्णा पाणी तंटा लवादाने सात टीएमसी पाणी मिळण्यासाठी मान्यता दिली असून, योजनेअंतर्गत काम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यातील एक लाख 15 हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार असल्याची माहिती आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी बुधवारी (ता.21) पत्रकार परिषदेत दिली. 

आमदार ठाकूर म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळात योजनेसाठी पुरेसा निधी मिळत नव्हता. मिळालेल्या निधीतून नेत्यांचे सिंचन झाले; मात्र पाणी मिळाले नाही. कोल्हापूर, सांगलीकडे पूरस्थिती आहे, तर मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती भयानक आहे. त्यासाठी सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या योजनेसाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. योजनेतून 23.66 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, हे पाणी मराठवाड्याच्या हक्काचे आहे, असे ते म्हणाले. योजनेसाठी सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असून, 350 कोटी रुपये नाबार्ड पॅकेजमधून लवकरच मिळणार आहेत. सध्या नीरा-भीमा व जेऊर या दोन्ही बोगद्यांचे काम वेगाने सुरू आहे. जल आराखड्यातही 23.66 टीएमसी पाण्याची तरतूद आहे. तूर्त सात टीएमसी पाण्यासाठी मंजुरी मिळाली असून, ही योजना कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

दरम्यान, आमदार ठाकूर यांची कोयना-टाटा जलविद्युत समूहाच्या तज्ज्ञ समितीत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष माधव पवार, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, पंचायत समितीचे उपसभापती युवराज जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य दिग्विजय शिंदे, सयाजी चालुक्‍य, रमेश माने, पंडित शिंदे, नगरसेवक इरप्पा घोडके, गोविंद घोडके, अरुण इगवे, दादा शिंदे, अमर वरवटे, संजय कोथळीकर, नेताजी गायकवाड, दत्ता रोंगे, किरण रामतिर्थे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about water