साठ गावे अजूनही व्याकूळ

File photo
File photo

उमरगा (उस्मानाबाद) : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतील पिकांची स्थिती नाजूक आहे. शिवाय तलावांची संख्या मुबलक असली तरी सिंचनासाठी पाणी नाही. उन्हाळ्यानंतर पावसाळ्यातही पाण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ होत आहे. ऑगस्ट निम्मा झाला तरी तालुक्‍यातील 50 गावांत 130 अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, 11 गावांत 15 टॅंकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्‍यातील 13 तलाव कोरडे आहेत, तर 12 तलावांतील पाणीपातळी जोत्याखाली आहे. 

तालुक्‍यातील जवळपास बारा गावांत फेब्रुवारीपासून पाणीटंचाई सुरू झाली, ती मार्च ते मे पर्यंत तीव्र झाली. पावसाचे वेगवेगळे अंदाज व्यक्त होत असताना जून, जुलै महिन्यांत दमदार पावसाने हजेरी लावली नाही. आता ऑगस्ट महिना संपत आला तरी सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. 

अधिग्रहणावर मदार 
पावसाअभावी जलस्रोत कोरडे आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 50 गावांत 130 अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बेळंब, कलदेव निंबाळा, कोराळ, कोळसूर (कल्याणी), पेठसांगवी, चिंचोली (जहागीर), कडदोरा, कदमापूर, कोराळ, मातोळा, कवठा येथे पंधरा टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. मुबलक पाऊस होऊन पाणीपातळी वाढेपर्यंत टॅंकर सुरू ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. सध्या प्रशासनाच्या विविध पथकांकडून पाणीटंचाईची पाहणी, अधिग्रहण स्थितीची माहिती घेण्यात येत आहे. 

बारा तलाव कोरडे 
तालुक्‍यात विविध प्रकारचे 33 सिंचन प्रकल्प आहेत. मात्र, मुबलक पाऊस नसल्याने तलावाची स्थिती उन्हाळ्यासारखी आहे. पेठसांगवी, सरोडी, बलसूर तलाव क्रमांक एक व दोन, कोराळ, एकूरगा, सुपतगाव, नारंगवाडी, कसमलवाडी, कोरेगाववाडी, कुन्हाळी, वागदरी या सिंचन प्रकल्पांत थेंबभरही पाणी नाही. कोरेगाव, आलूर तलाव क्र. एक व दोन, गुंजोटीवाडी, मुरळी, भुसणी, गुंजोटी, कदेर, जकापूर, तुरोरी, कोळसूर, डिग्गी येथील तलावांची पाणी पातळी जोत्याखाली आहे. केसरजवळगा तलाव क्रमांक एक व दोन, तलमोडवाडी, भिकार सांगवी, कसगी, काळनिंबाळा व दाळिंब येथील तलावात केवळ खड्ड्यांत पाणी साचले आहे. बेन्नीतुरा प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या काळात बिकट स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com