प्रकल्प 223, जलसाठा 0.89 टक्के

राजेंद्रकुमार जाधव
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होईल, असा एकही मोठा पाऊस झालेला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व 223 प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी केवळ 0.89 टक्के इतकाच पाणीसाठा आहे. 117 प्रकल्प तर कोरडेच आहेत.

उस्मानाबाद ः पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होईल, असा एकही मोठा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील सर्व 223 प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी केवळ 0.89 टक्के इतकाच पाणीसाठा आहे. 117 प्रकल्प तर कोरडेच आहेत. त्यामुळे आगामी काळात मोठा पाऊस न झाल्यास अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षीही कमी पाऊस झाला होता. त्यामुळे दुष्काळाचे चटके तीव्र झाले होते. त्यामुळे यंदा सर्वांच्याच नजरा आभाळाकडे होत्या. मात्र, निराशाच पदरी पडल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. कधीतरी, कुठेतरी तुरळक, रिमझिमच्या पलीकडे पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा गेल्यावर्षीपेक्षा भीषण स्थिती आहे. जिल्ह्यात एक मोठा, 17 मध्यम, 205 लघू प्रकल्प आहेत. यापैकी 11 मध्यम, 106 लघू प्रकल्प कोरडे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना अद्यापही टॅंकर, अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. 

गेल्या दहा ते बारा वर्षांत प्रकल्पात एक टक्‍क्‍यापेक्षाही कमी पाणीसाठा असल्याची यंदाची ही पहिलीच वेळ आहे. याच महिन्यात 2008 मध्ये 1.91 टक्के, 2012 मध्ये 1.24 टक्के, 2015 मध्ये 1.16 टक्के सरासरी पाणीसाठा होता. यावेळी केवळ 14 लघू प्रकल्पांतच काही प्रमाणात पाणी आहे. 205 लघुप्रकल्पांत 1.15 टक्के, तर 17 मध्यम प्रकल्पांत 0.70 टक्के असे सरासरी 0.89 टक्के पाणीसाठा आहे. 17 मध्यम प्रकल्पांपैकी एकमेव नळदुर्ग येथील कुरनूर (बोरी) प्रकल्पात 4.40 टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांतून तुळजापूर, नळदुर्ग शहर व अणदूरला पाणीपुरवठा केला जात आहे. दोन लघुप्रकल्पांत 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी, एक मध्यम व 14 प्रकल्पांत 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी, पाच मध्यम व 81 लघुप्रकल्पांत ज्योत्याच्याखाली साठा आहे. 11 मध्यम, 106 लघू प्रकल्प कोरडे आहेत. 

भूजलपातळीत घट 
ऑगस्ट निम्मा झाला तरी पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होत आहे. अधिग्रहण, टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. भूजल पातळीतही घट होत गेल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडत आहेत. परिणामी, मोठा पाऊस न झाल्यास टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा कोठून करायचा, असा प्रश्‍नही निर्माण होऊ शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Water