जिल्ह्यातील 76 प्रकल्प कोरडेच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यातील चित्र, केवळ नऊ टक्केच पाणीसाठा 

उस्मानाबाद ः पावसाळा अंतिम टप्प्यात आला तरी जिल्ह्यात 76 प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत. त्यात 10 मध्यम आणि 66 लघुप्रकल्पांचा समावेश आहे. गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे पाच मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यंदा केवळ नऊच लघुप्रकल्प पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पाणीटंचाईची तीव्रता कायम राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात एक मोठा, 17 मध्यम आणि 205 लघुप्रकल्प आहेत. यंदा पावसाळा अंतिम टप्प्यात आला तरी बहुतांश प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. केवळ नऊच लघुप्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. चार लघुप्रकल्पांत 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक, आठ लघुप्रकल्पांत 26 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक, 26 लघुप्रकल्पांत 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी, दोन लघुप्रकल्पांत ज्योत्याच्या खाली पाणीपातळी आहे. 66 प्रकल्प कोरडेच आहेत. एका मध्यम प्रकल्पातच 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा असून, चार प्रकल्पांत 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी, दोन मध्यम प्रकल्पांत ज्योत्याच्या खाली पाणीपातळी आहे, तर 10 मध्यम प्रकल्प कोरडेच आहेत. यापैकी नळदुर्ग येथील कुरनूर (बोरी) मध्यम प्रकल्पात 61 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा असून, हरणी, खंडाळा, जकापूर, बेन्नीतुरा या चार मध्यम प्रकल्पांत 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. 

पावसाळ्यातही जिल्ह्यातील अनेक गावांना अधिग्रहण, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. अपेक्षित पावसाअभावी भूजल पातळीतही वाढ झाली नाही. त्यामुळे अनेकांच्या विहिरी, कूपनलिका कोरड्या आहेत. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या काही भागांत झालेल्या दमदार पावसामुळे काही प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. आठवडाभरात झालेल्या पावसामुळे नऊ लघुप्रकल्प भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. मात्र, उर्वरित 214 प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. सध्या पावसाळा अंतिम टप्प्यात आहे. तरीही जिल्ह्यातील या सर्व 223 प्रकल्पांत मिळून सध्या केवळ 8.68 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. उमरगा, लोहारा तालुक्‍यांच्या काही भागांत मध्यंतरी झालेल्या दमदार पावसामुळे प्रशासनाने बहुतांश भागांतील अधिग्रहणे, टॅंकर बंद केले आहेत. त्यामुळे त्या भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अंतिम टप्प्यात दमदार पाऊस नाही झाले तर जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. 

शंभर टक्के भरलेले प्रकल्प 
होर्टी लघुप्रकल्प, मुर्टा साठवण तलाव, होर्टी साठवण तलाव क्रमांक एक, सलगरा (दिवटी) साठवण तलाव, किलज साठवण तलाव, मुर्टा साठवण तलाव क्रमांक दोन, जळकोट साठवण तलाव, अलियाबाद साठवण तलाव, होर्टी साठवण तलाव क्रमांक दोन. हे सर्व प्रकल्प तुळजापूर तालुक्‍यातील आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about water