भावी पोलिसांचा जलसंधारणाचा वसा 

महेश गायकवाड
सोमवार, 15 जुलै 2019

समाजात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आयुष्य वाहून घेण्याचा संकल्प केलेल्या भावी पोलिसांनी जलसंधारणाचाही वसा घेतला आहे. त्यामुळे जालन्याच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या तब्बल दोनशे एकरांवरील परिसरात श्रमदान करीत लाखमोलाचे पाणी अडविले आहे. विहिरींचे खोलीकरण, गाळ उपसा, चर, बंधारे आदी माध्यमातून तब्बल एक कोटी लिटर पाणी अडविले गेले आहे, हे विशेष. 

जालना - समाजात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आयुष्य वाहून घेण्याचा संकल्प केलेल्या भावी पोलिसांनी जलसंधारणाचाही वसा घेतला आहे. त्यामुळे जालन्याच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या तब्बल दोनशे एकरांवरील परिसरात श्रमदान करीत लाखमोलाचे पाणी अडविले आहे. विहिरींचे खोलीकरण, गाळ उपसा, चर, बंधारे आदी माध्यमातून तब्बल एक कोटी लिटर पाणी अडविले गेले आहे, हे विशेष. 

पोलिस प्रशासनात येणारा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडत असतो; मात्र आपल्या जबाबदारीच्या पलिकडे जाऊन काहीच जण वेगळे कार्य करतात. पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी नामदेव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचे लाखमोलाचे जलसंधारणाचे काम प्रशिक्षण केंद्राच्या जवानांनी केले आहे. अर्थात, या कामाला जिल्ह्यातील भीषण दुष्काळ हे कारण ठरले. जिल्ह्यात सुरू झालेली पाणीटंचाई पावसाळ्यातही सुरूच आहे. या काळात केंद्रातील जलस्रोत आटल्याने टंचाईचे काही चटके पोलिस प्रशिक्षण केंद्रालाही सोसावे लागले.

केंद्रासाठी रोज सात ते आठ टॅंकरच्या फेऱ्या होत होत्या. निसर्गप्रेमी आणि कृषी क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या श्री. चव्हाण यांनी हे चित्र बदलण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी पाणी फाउंडेशनने केलेल्या कार्याचा अभ्यास केला; तसेच तज्ज्ञ प्राध्यापकांकडून जवानांनाही कामाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर एप्रिल ते जून या काळात चार टप्प्यांत 208 एकर परिसरात खोलगट समतल चर, मातीनाला बंधारे, नाला खोलीकरण अशी विविध जलसंधारणाची कामे 1160 जवांनाच्या विविध टीमने श्रमदानातून पूर्ण केली. श्री. चव्हाण यांनी वेळोवेळी तांत्रिक बाबी सांगून त्या पद्धतीने ही कामे करून घेतली. महत्त्वाची बाब म्हणजे पावसाळा सुरू होण्याआधीच जवानांनी दहा ते पंधरा फूट खोदलेल्या विहिरीला पाझर फुटले आणि जवानांच्या घामाचे चीज झाले. सुरवातीला अवघड वाटणारे हे काम खळखळते पाणी दिसू लागल्यानंतर मोठ्या उत्साहात सुरू झाले. पहिल्या पावसातच परिसरातील विहिरी पाण्याने गच्च भरल्याने या कामाची किमया सर्वांना कळाली आणि आता ते अधिक जोमाने पुन्हा सुरू झाले आहे. या कामात झटणाऱ्या जवांनाच्या हातांना प्रोत्साहन आणि केलेल्या कामांची शाबासकी म्हणून श्री. चव्हाण यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. 
 
एका ठिकाणी पाण्याची साठवणूक 
पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या 208 एकर परिसरात करण्यात आलेल्या सर्व जलसंधारण कामे पाण्याने भरल्यानंतर वरून वाहणारे पाणी शेवटी केंद्रातील 250 मीटर लांब असलेल्या मोठ्या नाल्याला मिळेल अशा पद्धतीने करण्यात आले आहे. नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे या नाल्यात तब्बल एक कोटी लिटर पाणी साठवणूक क्षमता झालेली आहे. नाल्याच्या शेवटच्या भागावर मातीची भिंत जवानांनी उभारली आहे. 
 
 

प्रशिक्षणार्थींना श्रमदान आणि श्रमप्रतिष्ठेचे मूल्य समजावे या उद्देशाने जलसंधारणाचे काम हाती घेतले. जवानांच्या श्रमदानातून ही किमया साधता आली याचा आनंद आहे. जलसंधारण कामामुळे पावसाचे पाणी केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झिरपणार असून केंद्राला भविष्यात पाण्याची गरज पडणार नाही. 
- नामदेव चव्हाण, 
प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Water conservation