जायकवाडीत वाढले चार टक्के पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. रविवारपासून (ता. 28) पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे चार टक्के पाणी वाढले आहे.

पैठण (जि. औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. रविवारपासून (ता. 28) पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे चार टक्के पाणी वाढले आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. 30) धरणात दाखल झालेल्या पाण्याचे जलपूजन जलसंपदा विभाग करणार आहे, अशी माहिती धरण सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी दिली.

धरणाची पाणीपातळी 1490.83 फूट असून मीटरमध्ये 454.406 आहे. पाणी येण्याचे प्रमाण 21 हजार 921 क्‍युसेक आहे. तसेच उपलब्ध पाणीसाठा 150.030 दशलक्ष घनमीटर (उणे), तर एकूण पाणीसाठा 587.576 दशलक्ष घनमीटर (उणे) आहे. दरम्यान, नांदूर-मधमेश्वर धरणातून पाणी येण्याचे प्रमाण सोमवारी कमी झाले असले तरी रात्रीतून त्यात वाढ होणार आहे, असे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. 
 
आचारसंहितेमुळे जलपूजनासाठी नेत्यांची अडचण! 
जायकवाडी धरणात दाखल झालेल्या पाण्याचे जलपूजन करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांची चढाओढ पाहायला मिळत असे. परंतु यंदा मात्र या नेत्यांची मोठी अडचण औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या लागलेल्या आचारसंहितेमुळे झाली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाचे अभियंता व तालुका प्रशासनाचे अधिकारी यांच्या हस्ते हा जलपूजनाचा कार्यक्रम होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about water level of Jayakwadi dam increases