येडशी-कळंब रस्त्याची लागली 'वाट', वाहतूक सुसाट

सयाजी शेळके
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

पर्यायी मार्ग म्हणून दोन वर्षांपासून वापर, दुरुस्तीकडे दुर्लक्ष 

उस्मानाबाद : येडशी (ता. उस्मानाबाद) ते कळंब या रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून गेल्या दोन वर्षांपासून वापर सुरू आहे. मात्र त्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची अक्षरश: "वाट' लागली आहे. 

येरमाळा ते कळंबपर्यंत रस्ता नव्याने कॉंक्रीटचा केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामामुळे उन्हाळ्यात धुळीचे लोट उडत होते, तर पावसाळ्यात संपूर्ण रस्ता निसरडा, चिखलमय होता. दरम्यान, संपूर्ण रस्ता उखडल्याने कळंबहून बार्शी, कुरुडवाडी, पुणे आदी शहरांकडे जाणाऱ्या अनेक वाहनचालकांनी कळंब ते येडशी या रस्त्याचा उपयोग केला. त्यामुळे अवजड वाहनेही या मार्गावरून गेली. दरम्यान, हा रस्ता पूर्वी चांगला होता. मात्र अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

हेही वाचा - राजकीय चर्चेत वाद, मित्राचा तोडला कान

पर्यायी मार्ग म्हणून अनेक वाहनचालकांनी कळंब ते येडशी मार्गाचा वापर केला. याशिवाय कळंब ते ढोकी (ता. कळंब) या मार्गाचेही काम सुरू आहे. त्यामुळे उस्मानाबादकडे जाणारी अनेक वाहने सध्या कळंब - येडशी - उस्मानाबाद अशा मार्गाने धावत आहेत. दोन्ही रस्ते नूतनीकरणासाठी उखडले आहेत. त्यामुळे साहजिकच या रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सध्या येडशी - कळंब मार्ग पूर्णपणे खिळखिळा झाला आहे. 

वाहतूक वाढली, दुरुस्तीचे काय? 
प्रत्येक रस्त्यावरून होणारी वाहतूक किती आहे, यावरून रस्त्याचा दर्जा ठरविला जातो. त्यानुसारच संबंधित रस्त्याची बांधणी केली जाते. येडशी - कळंब गेल्या सात वर्षांपूर्वीच राज्यमार्ग झाला आहे. मात्र तेव्हापासून संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती एकदाही झाली नाही. किरकोळ काही ठराविक अंतरासाठी दुरुस्ती केली जाते. तुकडे-तुकडे करून ठेकेदारांना वाटप केले जातात. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा टिकत नाही. परिणामी अनेक ठिकाणी खड्डे पडतात. 

हेही वाचा ः मूल संकटात असेल, तर काय करावे?

पाण्याचा निचरा होण्याकडे दुर्लक्ष 
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून वाहने ये-जा करीत होती. इतर मार्गावर चिखल झाल्याने या मार्गावरील लोड वाढला होता. अनेक ठिकाणी खड्डे पडले. त्यामध्ये पाणी साचले. मात्र त्या ठिकाणचे पाणी रस्त्याबाहेर काढून दिले नाही. त्यामुळे मोठमोठे खड्डे पडले. परिणामी संपूर्ण रस्ता खिळखिळा झाला. मात्र दुरुस्ती झाली नाही. वर्दळीच्या या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष का, असा प्रश्‍न प्रवाशांतून विचारला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about yedshi-kalamb Road