जीपला वाचविण्याच्या प्रयत्नात बस कलंडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

एक जखमी, बसचे 30 हजारांचे नुकसान 

उमरगा (जि.उस्मानाबाद) : बससमोर अचानक आलेल्या टाटा सुमो जीपला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याखाली उतरल्याने एकजण जखमी झाला. तर बसचे 30 हजारांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी (ता.18) दुपारी साडेबाराच्या सुमारास महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर घडली.

याबाबतची माहिती अशी, की बारामती आगाराची बस (एमएच- 14, बीटी- 4791) हैदराबाद येथून उमरग्याच्या दिशेने निघाली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मनाळी गावाजवळ असताना समोरून अचानक टाटा सुमो जीप (एमएच- 04, डीव्ही- 6270) आली. जीपला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाने राष्ट्रीय महामार्गावरून अचानक वळण घेतले. मात्र, बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कलंडली. या बसमधून 30 प्रवासी प्रवास करीत होते.

दरम्यान, या अपघातात बसमधील बब्रुवान उदाजी बोरसुरे (वय 75, रा. वांजरखेडा) हे जखमी झाले. अन्य प्रवासी सुखरूप असून, बसचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उमरगा आगारप्रमुख पी. व्ही. कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी आगारप्रमुख श्री. कुलकर्णी, एन. टी. जमादार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News abuot accident