न्हावा-शेवात अडकतोय औरंगाबादचा कच्चा माल

आदित्य वाघमारे
रविवार, 1 जुलै 2018

औरंगाबाद - उद्योगांनी आयात केलेल्या कच्च्या मालाचे कंटेनर वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या औरंगाबादसाठीच्या फेऱ्या कमी असल्याने हा माल न्हावा-शेवा बंदरातच अडकून पडत आहे. यामुळे औरंगाबाद-जालन्यातील उद्योगांना आवश्‍यक मालाचा पुरवठा वेळेवर होत नसून, त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. 

औरंगाबाद - उद्योगांनी आयात केलेल्या कच्च्या मालाचे कंटेनर वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या औरंगाबादसाठीच्या फेऱ्या कमी असल्याने हा माल न्हावा-शेवा बंदरातच अडकून पडत आहे. यामुळे औरंगाबाद-जालन्यातील उद्योगांना आवश्‍यक मालाचा पुरवठा वेळेवर होत नसून, त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. 

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील उद्योग जर्मनी, युरोपियन राष्ट्रे आणि चीनसारख्या विविध देशांतून कच्चा माल आयात करतात. समुद्रामार्गे हा माल न्हावा-शेवा (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) येथे येतो. येथून हा माल मालगाडीने सुमारे ४०० किलोमीटरचे हे अंतर पार करून माळीवाडा येथील ड्रायपोर्टला आणला जातो. मात्र, या मार्गावर आठवड्यातून मालगाडीची एकच फेरी होते.

त्या तुलनेत या बंदरावर येऊन पडणारा माल अधिक असल्याने सगळा माल एका फेरीत आणता येत नाही. उर्वरित मालासाठी पुढील फेरीची वाट पाहावी लागते. परिणामी उद्योगांना वेळेवर माल उपलब्ध होत नाही. त्यामुळे उत्पादनात अडचणी येतात. तसेच साठवण करण्याजोगा कच्चा माल नसल्याने ही प्रक्रिया खर्चिक आणि अवघड आहे. त्यामुळे आवश्‍यक तेवढाच माल मागवला जातो. परिणामी वेळेवर ऑर्डर पूर्ण करणे अवघड होते.

आठवड्याला १३५ कंटेनर 
न्हावा-शेवा येथून आठवड्याला केवळ १३५ कंटेनर माळीवाड्याला आणले जातात. यामध्ये चाळीस फुटांचे ४५, तर वीस फुटी मापाच्या ९० कंटेनरचा समावेश आहे. वीस फुटी कंटेनर सुमारे १९५० ते २४५० टन, तर चाळीस फुटी कंटेनर १०५० ते १८०० टन माल वाहतूक करू शकतात.

कच्चा माल पुरेसा नसल्याने उत्पादनक्षमता असताना उत्पादन घेणे अवघड होते. या मालगाडीची फेरी वाढवावी यासाठी उद्योगमंत्र्यांकडे वाळूज औद्योगिक संघटनेने मागणी केली आहे. 
- ए. के. सेनगुप्ता, उद्योजक, वाळूज.

या विषयाचा अभ्यास करावा लागेल. यात अनेक खाती सहभागी असून, एका कार्यालयातून यावर निर्णय होणार नाही. असे असल्यास, आपण योग्य त्या ठिकाणी या विषयासाठी पाठपुरावा करू. 
- विवेक देशपांडे, सदस्य, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट.

Web Title: nhava-sheva port raw material container