पुतणीने चार लाखांची सुपारी दिल्याचे उघड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

खाडगाव रोड भागातील वैभव गणेश ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन साठे (वय 65) यांच्या खुनाची पुतणीनेच सुपारी दिल्याचे समोर आले होते. यातील आणखी संशयित आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून पुतणीनेच चार लाखांची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पुण्याहून तिघांना अटक केली आहे.

लातूर ः येथील खाडगाव रोड भागातील वैभव गणेश ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन साठे (वय 65) यांच्या खुनाची पुतणीनेच सुपारी दिल्याचे समोर आले होते. यातील आणखी संशयित आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून पुतणीनेच चार लाखांची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पुण्याहून तिघांना अटक केली आहे.

या तिघांनाही ता. 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या सहा झाली आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक माळी यांनी दिली. 

येथील खाडगाव रस्त्यावरील वैभव गणेश ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन साठे हे बुधवारी (ता. सहा) सायंकाळी शेतातून घराकडे दुचाकीवर येत असताना एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. यातच त्यांचा मृत्यू झाला होता; पण हा नियोजनपूर्वक खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. जनार्दन साठे यांची पुतणी पूजा साठे हिनेच चार लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे पोलिस तपासात आता उघड झाले आहे, अशी माहिती श्री. माळी यांनी दिली. 

या प्रकरणात जनार्दन साठे यांच्या मुलाच्या खून प्रकरणात तुरुंगात असलेले विलास साठे, गोपाळ साठे, अश्विन साठे, सचिन साठे, सोमनाथ साठे, दीपक साठे, अमोल साठे यांच्यासह त्यांची पुतणी पूजा साठे, आशिष जाधव, गौरव लोहार, माजी नगरसेवक विष्णू साठे, धनराज साठे, प्रेम मोरे, करणसिंह गहिरवार, गोविंद गहिरवार अशा एकूण 14 जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा विलास साठे ही आपल्या वडिलांना भेटण्यासाठी वारंवार तुरुंगात जात होती. तेथे उदगीरमधील एका तरुणाशी तिची ओळख झाली. या तरुणाचे वडीलही तुरुंगात आहेत. वारंवार भेट होत गेल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला; पण वडील तुरुंगातून बाहेर आल्याशिवाय लग्न करता येणार नाही हे तिच्या लक्षात आले; पण जनार्दन साठे हे आपल्या वडिलांचा जामीन होऊ देत नाहीत.

त्यामुळे या तरुणाच्या सहकार्याने जनार्दन साठे यांना संपविण्याचे तिने ठरविले. यातून तिने हा सर्व प्रकार घडवून आणला होता. या प्रकरणात सुरवातीला पोलिसांनी पूजा साठे, गोविंद गहिरवार आणि गौरव लोहार या तिघांना अटक केली होती. या तिघांना ता. 11 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी आहे. दरम्यान, पोलिसांचे एक पथक पुण्याला गेले होते. त्यांनी या प्रकरणातील जनार्दन साठे यांची दुचाकी उडविणाऱ्या चारचाकी वाहनात असलेला आशिष जाधव, रेकी करणारा दीपक गवळी; तसेच निशांत जगताप या तिघांना पोलिसांनी रविवारी (ता. 10) अटक केली.

त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता ता. 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती श्री. माळी यांनी दिली. या प्रकरणात अटक झालेल्याची संख्या आता सहा झाली आहे. इतर संशयित आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: niece plotted murder of janardhan sathe