निलंगा पाणीपुरवठा योजना चालणार सौरऊर्जेवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाकडून ८४ कोटी रुपयाची योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे तीस टक्के काम पूर्ण झाले आहे. शिवाय या पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत पंप सौरऊर्जेवर चलणार असल्यामुळे विजेची मोठी बचत होणार आहे.

विजेची होणार बचत, ८४ कोटी रुपयांच्या योजनेचे ३० टक्के काम पूर्ण
निलंगा - शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाकडून ८४ कोटी रुपयाची योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे तीस टक्के काम पूर्ण झाले आहे. शिवाय या पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत पंप सौरऊर्जेवर चलणार असल्यामुळे विजेची मोठी बचत होणार आहे.

राज्यातील नागरी भागात मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्याकरिता महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत निलंगा नगरपरिषदेकडून दाखल केलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पास शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली असून जवळपास ८४ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत अत्याधुनिक पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार असून शहरातील नागरिकांना २४ तास पाणी मिळणार आहे.

यापूर्वी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी माकणी (ता. लोहारा) येथे निम्न तेरणा प्रकल्पातून दर्जाचे नगरपालिका असतानाही हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता. काळी माती व पाइपच्या अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात गळतीचे प्रमाण होते. त्यामुळे आता लोखंडी पाइप पृष्ठभागावरून टाकण्यात येणार असून सतत लिकेजची समस्या सुटणार आहे. या योजनेत पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर, चार जलकुंभ, नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिल्टर, माकणी ते निलंगा ५५ किलोमीटर लोखंडी सेन्सरयुक्त पाइपलाइन, शहरात १२८ किमी अंतर्गत पाइपलाइनचा समावेश आहे. 

या प्रकल्पाअंतर्गत सर्व मोटारी सौरऊर्जेवर चालणार असल्याने विजेची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. 

शहरातही अंतर्गत पाइपलाइन होणार असून त्यात तीन जलकुंभांचे तीन झोन करण्यात आले आहेत. 

एम.आय.डी.सी. येथे पहिले जलकुंभ तयार केले जात असून नगरपालिका व आय.टी.आय. येथे जलकुंभ होणार आहे. उदगीर मोडवरती वीज प्रकल्पाच्या मागे जलकुंभाचे काम सुरू आहे. शहरात अंतर्गत पाइपलाइन कामाची सुरवात झाली असून शहरातील म्हाडा, देवी मंदिर, शिवाजीनगर, लोंढेनगर बॅंक कॉलनी येथे या कामास सुरवात झाली आहे. कामाची मुदत दोन वर्षांची असून केवळ दोन महिन्यांत माकणी प्रकल्पातील पाणीपुरवठा विहीर काम पूर्ण झाले आहे. इंटेक विहीर व कनेक्‍ट ब्रीजही पूर्ण झाले असून, मुख्य पाइपलाइनचे काम ३० टक्के झाले आहे. आधुनिक फिल्टरचे काम किल्लारी येथील फिल्टरवर सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपरिषदेकडून या सर्व कामांचे निरीक्षण केले जात आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्याने ही योजना मंजूर झाली असून येत्या नऊ महिन्यांत ही योजना पूर्ण होणे अपेक्षित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilanga Water Supply Scheme on Solar Power