लातूरच्या 'एसटीपी' प्रकल्पावरून राजकारण तापले, निलंगेकरांनी देशमुखांवर साधला निशाना.  

nilengekar deshmukh.jpg
nilengekar deshmukh.jpg

लातूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर महानगरपालिकेच्या सांडपाणी (एसटीपी) प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून उपलब्ध होणारे पाणी येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत उभारल्या जाणाऱ्या मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाला देण्याचा करारही करण्यात आलेला आहे.

या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी मनपातील तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांनी निविदा प्रक्रियाही पूर्ण केली होती. मात्र, हा प्रकल्प अजूनही सुरू झालेला नसून यामुळे मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पास पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुळे हजारो लोकांना रोजगार देणारा मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्प लातूर येथून गेला तर लातूरची जनता सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाही, अशा शब्दांत माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत श्री. निलंगेकर यांनी याविषयावर प्रशासकीय अधिकाऱ्‍यांची झाडाझडती घेऊन एसटीपी प्रकल्प उभारला जात नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.
 
लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाला वेगाने चालना मिळावी यासाठी श्री. निलंगेकर यांच्या पाठपुराव्यातून येथे देशातील चौथा रेल्वे बोगी प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. या बोगी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. लातूरला जाणवणारी पाणीटंचाई यामुळे या प्रकल्पास पाण्याची कमतरता भासू नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून लातूर महानगरपालिकेला सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प (एसटीपी) उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या प्रकल्पातून उपलब्ध होणारे पाणी रेल्वे बोगी प्रकल्पाला देण्याचा करारही झालेला आहे.

त्यामुळे या प्रकल्पाला पाण्याची कमरता भासणार नाही आणि मनपाच्या आर्थिक उत्पन्नात भरही पडण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या स्वच्छतेतही मोठी भर पडणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प जलदगतीने उभारला जावा यासाठी महापालिकेतील तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांनी यासाठी आवश्यक निविदा प्रक्रियाही पूर्ण केली होती. त्यानंतर राज्यात आणि महापालिकेत सत्तांतर झाले. कॉंग्रेस सत्तेत असतानाही अजूनही हा प्रकल्प सुरू झालेला नाही. तो कागदावरच आहे. 

त्यामुळे मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पास पाण्याची कमतरता भासण्याची भीती व्यक्त होत आहे. ही बाब लक्षात घेऊन दिशा समितीच्या बैठकीत श्री. निलंगेकर यांनी यासंदर्भात प्रशासनाला विचारणा करून झाडाझडती घेतली. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पास पाण्याची कमतरता भासल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. हा प्रकल्प सुरू न झाल्यास मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्प इतरत्र स्थलांतरीत झाल्यास विद्यमान सत्ताधाऱ्यांना लातूरची जनता माफ करणार नाही, असा इशारा माजी पालकमंत्री निलंगेकर यांनी विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांना अप्रत्यक्षरीत्या दिला. 


(Edited By Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com