‘नाईन ड्रॅगन’ची शेंद्रा येथे एंट्री

औरंगाबाद - नाईन ड्रॅगनच्या सामंजस्य कराराची मुंबईत देवाणघेवाण करताना एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन, नाईन ड्रॅगनचे ग्रुप डेप्युटी चेअरमन केन ल्यू. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, चेअरलेडी तांग चेऊंग जे. पी. आदी.
औरंगाबाद - नाईन ड्रॅगनच्या सामंजस्य कराराची मुंबईत देवाणघेवाण करताना एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन, नाईन ड्रॅगनचे ग्रुप डेप्युटी चेअरमन केन ल्यू. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, चेअरलेडी तांग चेऊंग जे. पी. आदी.

औरंगाबाद - जगातील अव्वल पेपर उद्योगांपैकी एक असलेल्या ‘नाईन ड्रॅगन’ या चिनी कंपनीने भारतात एंट्री केली आहे. कोकणातील देहरंड (अलिबाग) आणि औरंगाबादेतील शेंद्रा डीएमआयसीमध्ये हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी या कंपनीने देहरंडला १५०, तर शेंद्रा येथे २५ एकर जागा घेण्याचे निश्‍चित केले आहे.

‘नाईन ड्रॅगन’ने भारतात येण्यासाठी ‘महाराष्ट्र’ हे प्रवेशद्वार म्हणून निवडले आहे. चार हजार पाचशे कोटींची ही मेगा गुंतवणूक राज्यात दोन ठिकाणी होणार आहे. त्यासाठी या कंपनीच्या कारभाऱ्यांनी कोकणातील देहरंड आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) शेंद्रा (औरंगाबाद) या नोडमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या मुंबईत झालेल्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत नाईन ड्रॅगनचे उच्चपदस्थ अधिकारी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी शनिवारी (ता. दोन) स्वाक्षरी केली. आगामी पाच वर्षांत नाईन ड्रॅगन चार हजार पाचशे कोटींच्या गुंतवणुकीतून दहा हजार जणांना रोजगार देणार असल्याचे या करारात स्पष्ट करण्यात आले आहे. या कंपनीचे अमेरिकेत चार कारखाने असून, भारतीय बाजारपेठेतील त्यांनी आपले मुख्य तळ देहरंड आणि शेंद्रा येथे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

देहरंडला कागद, शेंद्रा येथे अंतिम उत्पादन
बंदरालगत जागा गरजेची असल्याने नाईन ड्रॅगनला देहरंडमध्ये दीडशे एकर जागा ही उत्पादनासाठी दिली जाणार आहे. पेपर निर्मितीला सागरी मार्गाने गरजेचा असलेला पल्प आणला जाणार आहे. तेथेच यावर प्रक्रिया करून ते औरंगाबादेत आणले जाणार आहे. त्या कागदावर शेंद्रा येथे प्रक्रिया करून पेपरबोर्डचे खोके तयार केले जाणार आहेत. उदा. पॉपकॉर्न टब, कोल्ड्रिंक ग्लास, कप आदी वस्तू शेंद्रा येथे तयार केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

महिनाभरात झाला निर्णय 
डीएमआयसीच्या बिडकीन, शेंद्रा नोडमध्ये जागा पाहण्यासाठी या कंपनीचे शिष्टमंडळ काही दिवसांपूर्वी विशेष विमानाने औरंगाबादमध्ये आले होते. त्यांनी आधी बिडकीन, नंतर शेंद्रा येथील जागा नजरेखालून घातली. अंतिमतः त्यांनी शेंद्य्राला पसंती देत येथे २५ एकर जागा घेण्याचे निश्‍चित केले. यासाठी या कंपनीच्या कारभाऱ्यांना साधारण महिनाभराचा कालावधी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com