उदगीरात एकाच दिवसात साडेनऊ हजार ज्येष्ठांची तपासणी, का वाचा

Udgir News
Udgir News

उदगीर (जि.लातूर) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्माण झालेली धोक्याची दाहकता कमी करण्याच्या उद्देशाने उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या एकदिवसीय तपासणी मोहिमेत शहरातील एकोणीस हजार तीनशे अडुसष्ट घरांना प्रत्यक्ष भेट देऊन नऊ हजार सहाशे त्रेसष्ट ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली.


शहरातील कोरोना परिस्थिती पाहता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी येथील ५० वर्षे वयाच्या पुढील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशा सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार श्री. मेंगशेट्टी आणि श्री. मुंडे यांनी शुक्रवारी (ता. २६) उदगीरमधील सर्व यंत्रणांची बैठक घेतली.
बाहेरगावी गेलेल्या व घरे बंद असलेल्या या तपासणीत शिल्लक असलेल्या नागरिकांचीसुद्धा तपासणी करण्यात येणार आहे. या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेसाठी उदगीर शहराची एकूण सहा उपविभागांत विभागणी करण्यात आलेली आहे.

यासाठी तालुक्यातील हेर, देवर्जन, नळगीर, वाढवणा, हंडरगुळी या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, नगरपालिका कर्मचारी यांना या मोहिमेत सहभागी करून रविवारी (ता. २८) एकाच दिवशी संपूर्ण शहरातील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी १८५ पथके गठित करण्यात आलेली होती. या पथकामध्ये एक वैद्यकीय कर्मचारी, त्यांच्या मदतीला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, इतर कर्मचारी व शिक्षक यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. या तपासणी मोहिमेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार, डॉ. स्वाती सोनवणे, कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांच्यासह उपविभागाचे नोडल अधिकारी म्हणून डॉ. स्नेहा बोबडे, डॉ. सिकंदर निहाल, डॉ. विवेक टिकोरे, डॉ. रवी वाघमारे, डॉ. सुप्रिया चामलवाड, डॉ. वर्षा कानकाटे यांनी काम पाहिले.
या तपासणी मोहिमेत शहरातील धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालय, नगरपरिषद, रोटरी क्लब, लायन्स क्लब, प्रजापिता ब्रह्माकुमारी, अंबरखाने ब्लड बँक, ग्रीन आर्मी, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, ग्रामसेवक, रोटी-कपडा बँक, शासकीय व खासगी शिक्षक यांच्यासह अनेक स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदविला.

मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग
कोरोनाच्या संसर्गामुळे बळी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने आखलेली एका दिवसात आरोग्य तपासणी ही संकल्पना मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग आहे. सबंध लातूर जिल्ह्यात संबंधित कर्मचारी दररोज ठिकठिकाणची तपासणी करीत आहेत; मात्र सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या उदगीर शहराची एकाच दिवशी तपासणी हा मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com