दोन्ही मुलांना देशसेवेत पाठविणार - वीरपत्नी निशा गलांडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - माझे पती चंद्रकांत गलांडे देशाच्या रक्षणासाठी शहीद झाले. त्यांचा माझ्या कुटुंबासह राज्य आणि देशालाही अभिमान आहे. भविष्यात माझ्या दोन्ही मुलांना देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठविणार असल्याची भावना वीरपत्नी निशा गलांडे (जि. सातारा) यांनी व्यक्‍त केली.

औरंगाबाद - माझे पती चंद्रकांत गलांडे देशाच्या रक्षणासाठी शहीद झाले. त्यांचा माझ्या कुटुंबासह राज्य आणि देशालाही अभिमान आहे. भविष्यात माझ्या दोन्ही मुलांना देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठविणार असल्याची भावना वीरपत्नी निशा गलांडे (जि. सातारा) यांनी व्यक्‍त केली.

सकल जैन समाजातर्फे शहागंज येथील श्री. हिराचंद कासलीवाल प्रांगणात आयोजित वीर माता, पिता आणि पत्नीच्या गौरव कार्यक्रमात स्वाती गलांडे शनिवारी (ता. पाच) बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की शहीद जवानांची आठवण नागरिकांनी केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारीलाच काढू नये. त्यांना कायम स्मरणात ठेवायला हवे. जवानांमुळे देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. सध्या माझे दोन्ही दीर भारतीय लष्करामध्ये कार्यरत आहेत. यापुढेही माझ्या श्रेयस (वय पाच) आणि जय (वय तीन) या दोन्ही मुलांना सीमेवर नक्‍कीच पाठविणार. त्याचा मला अभिमान राहील. पहिल्यांदाच कोणत्या समाजातर्फे शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार होतोय. त्यामुळे लोकांनाही शहीद जवानांबद्दल तळमळ वाटेल. सकल जैन समाजाने केलेले आदरातिथ्य आणि सन्मानाबद्दल आम्ही सदैव ऋणी आहोत, असे त्या म्हणाल्या.

त्यानंतर मनोगत व्यक्‍त करताना शहीद जवान विकास जनार्दन कुळमेथे (यवतमाळ) यांच्या आई म्हणाल्या, की विकासला कुठल्याही नोकरीमध्ये आवड नव्हती. कायम लष्करात भरती होऊन देशाच्या सीमेवर लढण्याची त्याची इच्छा होती. त्यानुसार तो लष्करातही दाखल झाला. आता आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमा करत होता. लहान भावासाठी दहा हजार रुपये पाठवितो, असे त्याने शेवटचे सांगितले होते. मात्र, 18 सप्टेंबरनंतर त्याचा फोन अथवा मनीऑर्डर काहीही आले नाही. मात्र, याप्रसंगी औरंगाबादच्या सकल जैन समाजातर्फे गौरव करून आमचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले. त्यांचे आम्ही आभारी आहोत.

यावेळी शहीद संदीप सोमनाथ ठोक (ता. सिन्नर, जि. नाशिक), पंजाब जानकीराव उईके (नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) आणि नितीन सुभाष कोळी (मु. पो. दुधगाव, जि. सांगली) यांच्या कुटुंबीयांनी मनोगत व्यक्‍त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते "अमर जवान' प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून जवानांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष महावीर पाटणी यांनी केले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, नगरसेवक यशश्री बाखरिया, नंदकुमार घोडेले, बापू घडामोडे, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, पृथ्वीराज पवार, प्रफुल्ल मालाणी, भाजपा जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: nisha galande talking

टॅग्स