सध्याच्या सरकारपेक्षा निजामशाही बरी - चव्हाण 

सध्याच्या सरकारपेक्षा निजामशाही बरी - चव्हाण 

औसा (जि. लातूर) - नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विधानसभेत आवाज उठविला, तर या सरकारने विरोधी पक्षांतील १९ आमदारांचे निलंबन करून विरोधी पक्षांची आणि पर्यायाने शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली. अन्यायाविरुद्ध आवाज उठविला, तर त्याला बाहेर काढले जात असेल, तर या सरकारपेक्षा जुलमी निजामशाही बरी, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एमआयएम व इतर विरोधी पक्षांच्या वतीने काढलेल्या संघर्ष यात्रेदरम्यान रविवारी उजनी (ता. औसा) येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. तालुक्‍यातील बुधोडा, औसा, बोरफळ, आशीव या गावांतील लोकांशी नेत्यांनी आज संवाद साधला. गारपिटीत सर्वाधिक नुकसान झालेल्या येल्लोरी या गावाला नेत्यांनी भेट देऊन येथील शेतकरी गुंडप्पा निटुरे याला म्हणून एक लाख रुपये मदत दिली. संघर्ष यात्रेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार, अशोक चव्हाण, पतंगराव कदम, अबू आझमी, बसवराज पाटील, जितेंद्र आव्हाड आदींनी भाग घेतला. चव्हाण म्हणाले, की जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही, तोपर्यंत संघर्ष करीत राहू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्हाला संसदेतून बाहेर काढले तरी रस्त्यावर उतरून या सरकारच्या डोळ्यांवर चढलेले झोपेचे झापड उतरवू. या भागात जेव्हा भूकंप झाला, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि विलासराव देशमुखांनी खंबीरपणे भूकंपग्रस्त लोकांच्या पाठीशी उभे राहून जागतिक मदतीने त्यांना दिलासा दिला. हे सरकार केवळ रेटून बोलून व मशिनमध्ये गैरव्यवहार करून सत्तेवर आले आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

लातूरच्या संघर्ष यात्रेकडे दिग्गजांची पाठ
औसा - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी काढलेल्या चांदा ते बांदा संघर्ष यात्रेकडे जिल्ह्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे राज्यातील प्रमुख नेते, प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आमदार जिल्ह्यातील संघर्ष यात्रेत सहभागी झाले आहेत; तर शहरात असूनदेखील माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशोक पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख, दिलीपराव देशमुख, शैलेश चाकूरकर यांनी या संघर्ष यात्रेकडे पाठ फिरवली. धीरज देशमुख सहभागी झाले असले तरी या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा का माहीत नाहीत? - धनंजय मुंडे
निवडणुकीत मोदींनी जनतेला शब्द दिला होता, की आमची सत्ता आली, तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या वर पन्नास टक्के शेतमालाला भाव देऊ, तर फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची हमी दिली होती. आता कर्जमाफी शक्‍य नसल्याचे ते सांगत आहेत व आम्हाला म्हणत आहेत, की मी पाच पिढ्यांचा शेतकरी आहे. ते खरेच शेतकरी असते, तर शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना ठाऊक असत्या व शेतकरीविरोधी धोरण त्यांनी अवलंबले नसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com