निजामकालीन वास्तू बनली धोकादायक

मधुकर कांबळे
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निजामकालीन वास्तूला तब्बल 114 वर्षे झाली आहेत. वित्त विभागात गळत असल्याने छतावर बसवण्यात आलेली शहाबादी फरशी काढल्यानंतर छताला 20 ते 25 फूट लांबीची मोठी भेग पडल्याचे निदर्शनास आले.  छतावर पडलेल्या भेगेमुळे अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत.

औरंगाबाद : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निजामकालीन वास्तूला तब्बल 114 वर्षे झाली आहेत. वित्त विभागात गळत असल्याने छतावर बसवण्यात आलेली शहाबादी फरशी काढल्यानंतर छताला 20 ते 25 फूट लांबीची मोठी भेग पडल्याचे निदर्शनास आले. तर खाली लेखाधिकारी साधना बांगर यांच्या टेबलावर तीन बाय दोन एवढ्या आकाराचा सिमेंटचा तुकडा धाडकन पडला. सुदैवाने त्या रजेवर असल्याने अनर्थ टळला. छतावर पडलेल्या भेगेमुळे अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. मंगळवारी (ता.20) छताला पडलेले तडे पाहून तर कर्मचाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तातडीने वित्त विभागातील दालने रिकामी करण्याच्या सूचना बांधकाम विभागाकडून करण्यात आल्या आहेत. 

कार्यकारी अभियंत्यांच्या माहितीनुसार सध्या जिल्हा परिषदेचे मुख्यालय असलेल्या इमारतीचे बांधकाम 1905 मध्ये झाले आहे. निजामकाळात इथे तैतानिया आणि वस्तानिया (प्राथमिक शाळा) होत्या. नंतर 1958 मध्ये सध्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची या इमारतीमधून सुरवात झाली होती. परिसरातील मध्यवर्ती भागातील मुख्य इमारतीमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या व लेखाधिकाऱ्यांच्या दालनात गळत असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

या दालनावरील छतावर बसविण्यात आलेली फरशी काढण्यात आली असता फरशीखाली भले मोठे तडे गेल्याचे दिसले. वरच्या मजल्यावर भविष्य निर्वाह निधीचे दालन आहे, या कर्मचाऱ्यांनी सकाळी कार्यालयात भीत भीतच प्रवेश केला, कारण छत एवढे कमजोर झाले आहे की कधी पाय खाली जाईल याचा नेम नाही. मंगळवारी (ता.20) अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली. कार्यकारी अभियंत्यांनी दालने धोकादायक बनली असून, ते तातडीने रिकामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nizam's time building become dangerous