लातूर पालिकेकडे अँटिजेन टेस्ट किटचा तुटवडा; व्यापारी, हमालांची तपासणी लांबली

हरि तुगावकर
Tuesday, 18 August 2020

लातूर येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडते, व्यापारी, हमाल, मापाडींची कोरोना संदर्भात ॲंटीजेन टेस्ट करूनच बाजार सुरू करण्यात येणार होता; पण महापालिकेच्या वतीने तपासणीचा एकच दिवस फार्स करण्यात आला. त्यानंतर या आडत बाजाराकडे कोणी फिरकलेच नाही. ॲंटीजेन टेस्ट किटचा तुटवडा असल्याने ही तपासणीच झाली नाही.

लातूर : येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडते, व्यापारी, हमाल, मापाडींची कोरोना संदर्भात ॲंटीजेन टेस्ट करूनच बाजार सुरू करण्यात येणार होता; पण महापालिकेच्या वतीने तपासणीचा एकच दिवस फार्स करण्यात आला. त्यानंतर या आडत बाजाराकडे कोणी फिरकलेच नाही. ॲंटीजेन टेस्ट किटचा तुटवडा असल्याने ही तपासणीच झाली नाही. त्यामुळे आता बुधवारपासून (ता. १९) शेतमालाचा सौदा काढण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.

अनलॉक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व व्यापारी, अडते, हमाल, मापाडींची रॅपीड ॲंटीजेन टेस्ट करावी अशा सूचना होत्या. यातूनच महापालिकेच्या वतीने दोन दिवसांपूर्वी आडत बाजारात ही तपासणी सुरू करण्यात आली होती; पण दुपारपर्यंतच तपासणी करण्यात आली. त्यानंतर या बाजाराकडे कोणी फिरकलेच नाही. किटचा तुटवडा असल्याने ही तपासणीच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारपासून आता बाजारात सौदा काढण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. सकाळी नऊ वाजता सौदा काढला जाणार आहे.

वाचा : जालन्याच्या कुंडलिका नदीत तरूण गेला वाहून, शोध मोहिम सुरुच

सकाळी सहा ते अकरापर्यंत बाजार आवारात शेतकऱय़ांच्या वाहनाना प्रवेश दिला जाणार आहे. बाजार आवारातील व्यापारी वाहनांना सकाळी ११ नंतर प्रवेश दिला जाणार आहे. खरेदी विक्री व्यवहार सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहेत. सायंकाळी सात वाजता बाजार आवारातील सर्व गेट बंद करण्यात येणार आहेत. ॲंटीजेन टेस्ट किट उपलब्ध होत नसल्याने तपासणीत विलंब होणार आहे.

कोणाला ही टेस्ट करून घ्यावयाची असेल तर जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेल्या स्थळी किंवा खासगी लॅबमध्ये ही टेस्ट करून घ्यावी अशी सूचनाही बाजार समितीच्या वतीने संबंधीत घटकांना करण्यात आली आहे. कोविड-१९ मुळे शेतकरी बांधव, आडते, हमाल, मापाडी यांनी शारिरीक अंतराच्या नियमाचे व मास्कच्या नियमाचे पालन करून बाजार सुरू करावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा, उपसभापती मनोज पाटील, प्रभारी सचिव सतिश भोसले यांनी केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Antigen Test Kits To Latur Municipal Corporation