रिक्षात कोंबताच जागतात सिटी बसच्या आठवणी 

महेश गायकवाड
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

- जालनेकरांची अवस्था, पालिकेसह एसटीला पडेना फरक 
- तीन दशकांपूर्वीचा जालना चांगला म्हणण्याची वेळ 
- शेळ्या-मेंढ्यांसारखे रिक्षात कोंबले जाताहेत जालनेकर 
- विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला साऱ्यांचेच हाल 
- शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, बाजारपेठ चार दिशांना पसरलेले 
- रेल्वेस्टेशन एका बाजूला, बसस्थानक दुसरीकडे... 

जालना -  रामनगर-कन्हैयानगर ते मोतीबाग, बसस्थानक ते कलेक्‍टर ऑफिस, बसस्थानक ते गांधी चमनमार्गे मोतीबाग अशा सिटी बसची दिवसभर रेलचेल. खुर्चीत रेलून जालन्याचे धावते दर्शन करणारे विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, नागरिक असे हे तीस वर्षांपूर्वीचे चित्र. जालन्याचा विस्तार फार नव्हता; पण सिटी बस होती. आज चारही दिशांना जालना वाढले, इतके की शहराने आता महानगराचे रूप धारण केले आहे; मात्र साधी सिटी बसची सोय नाही. परिणामी रिक्षात कोंबले जाताच अनेकांना सिटी बस आठवत आहे. आकाराने छोटे असलेले जालनाच बरे होते, असे अनेकांना वाटू लागले आहे. 

जालन्याचा प्रचंड विस्तार 
कधीकाळी रामनगर, कन्हैयानगर, नवीन जालना, भोकरदन नाका, नूतन वसाहत, मुक्‍तेश्‍वरद्वार परिसरातील वसाहती असे जालना शहर. शहराच्या बाहेर वाटणाऱ्या कलेक्‍टर ऑफिस, न्यायालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद अशा इमारती जुन्या जालन्याच्या शनिमंदिर परिसरातूनही दिसत असत. ही सर्व ठिकाणे विविध भागांना शहर बसने जोडली गेलेली होती, हे विशेष. परिणामी जालनेकरांचा अंतर्गत प्रवास सुखदायी होता. गेल्या तीन दशकांपासून हे चित्र बदलले. जालन्याचा विस्तार प्रचंड झाला. चारही दिशांनी शहर वाढले. विशेषत: गेल्या पाच वर्षांत जालना शहराचा झालेला विस्तार लक्षणीय आहे. मंठा रोडवर सात किलोमीटरपर्यंत नवीन वसाहती वसल्या आहेत. यामध्ये कोठारी हिल्स, ऋषी विद्या परिसर, विष्णुपुरी, ब्रह्मपुरी यांचा समावेश आहे. तर अंबड रोडवरील इंदेवाडीचा यापूर्वीच नगरपालिकेत समावेश झालेला आहे. त्यामुळे सर्वाधिक विस्तार अंबड रोडकडे झाला आहे. तर औरंगाबाद महामार्गावर सिद्धिविनायकनगर, विठ्ठलनगर या मोठ्या नागरी वसाहतींची भर पडली आहे. या भागाबरोबर भोकरदन रस्त्यावर हिंदनगर, द्वारकानगर, रॉयलनगर या वसाहती नव्याने बनल्या आहेत. तर सिंदखेड मार्गावरचा ग्रामीण भाग शहराला जोडला गेला असून प्रशांतीनगर, टेलिकॉम कॉलनी, लक्ष्मीनगर, देवमूर्ती परिसर या नव्या वसाहती या ठिकाणी तयार झाल्या आहेत. जालन्यात एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी वैयक्‍तिक दुचाकी, चारचाकी वाहने किंवा ऑटोरिक्षावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. नव्या वसाहतींतील नागरिकांना मात्र जालन्यातील मध्यवर्ती भागात, बाजारपेठेत येणे परीक्षा पाहण्यासारखेच झाले आहे. 

कामगार सायकलीवर, दुचाकीवर 
जालना शहर हे बियाणे आणि स्टील उद्योगासाठी नावाजलेले; पण कामगारांना मात्र औद्योगिक वसाहती, कंपन्यांत जाण्यासाठी सिटी बसची व्यवस्था नाही. जालना-औरंगाबाद महामार्गावर कारखाने असले, तरी बसगाड्या मिळण्याची शाश्‍वती नसते. परिणामी कंपन्यांच्या परिसरातील वस्त्यांमध्ये राहावे लागते. अन्यथा सायकल, दुचाकीवरून कारखाने, कंपन्या गाठाव्या लागतात. 

शेतकरी, ग्रामस्थांचे हाल 
कलेक्‍टर ऑफिस, जिल्हा परिषद, न्यायालय; तसेच विविध कार्यालयांमध्ये शासकीय कामासाठी; तसेच बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी, खरेदीसाठी, बाजारपेठेतील कृषी केंद्र, जुना मोंढा आदी ठिकाणी जाण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थ बाहेरगावहून जालन्यात येतात; मात्र शहर बसची सोय नसल्याने ऑटोरिक्षात बसण्याशिवाय पर्याय राहात नाही. परिणामी रिक्षावाला सांगेल ते पैसे द्यावे लागतात. अर्थात, या प्रवासात वेळ आणि पैसा दोहोंचा अपव्यय होतो. 

भावी अभियंत्यांचे पालक चिंतेत 
जालन्यात शासकीय तंत्रनिकेतन; तसेच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय शहरापासून मोठ्या अंतरावर औरंगाबाद रस्त्यावर आहे. या ठिकाणी हात दाखवूनही बसगाड्या उभ्या राहत नसल्याचा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना पालकांनी दुचाकी विकत घेऊन दिलेल्या आहेत. जालना-औरंगाबाद मार्ग सर्वाधिक वर्दळीचा. सतत अवजड वाहने या रस्त्यावरून जातात, अपघातही नित्याचे. परिणामी पालकांचा जीव सतत टांगणीला असतो. अनेक भावी अभियंत्यांच्या दुचाकीला अन्य वाहनांची धडक बसण्याचे प्रकार वारंवार होतात. काहींना यापूर्वी जीवही गमावावा लागलेला आहे. त्यामुळे पालकांना सतत पाल्यांची चिंता सतावत असते. 

सर्वाधिक हाल विद्यार्थ्यांचेच 
नव्याने सुरू होत असलेल्या रसायन तंत्रज्ञान संस्था, शासकीय तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय यासह अन्य उच्चशिक्षण संस्था शहरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होतात. विशेषत: विद्यार्थिनींना रिक्षाने प्रवास करण्याशिवाय अन्यथा पायी जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. 

खासगी वाहनांचे भाडे मनमानी 
शहर बससेवा नसल्याने शहरात कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहनांचे वेगवेगळे दर आहेत. गांधी चमन परिसरातून बसस्थानकापर्यंत आणि याच ठिकाणाहून कमी अंतरावर असलेल्या रेल्वेस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय आदी परिसरात जाण्यासाठी वेगळे भाडे प्रवाशांकडून, नागरिकांकडून आकारले जाते. शिवाय सौजन्यपूर्ण वागणूक मिळण्याचीही शाश्‍वती नसते. 

शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पाणीपुरवठा, स्वच्छता या गोष्टींना प्राध्यान्य देऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. शहर बससेवा सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी आवश्‍यक रस्ते आणि इतर गोष्टींची पूर्तता करून येणाऱ्या काळात विद्यार्थी व नागरिकांसाठी बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. 
- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा 
----------- 
शहर बससेवा सुरू करण्यासाठी शासनाची मंजुरी घ्यावी लागते. यासंदर्भात मागणी असल्यास प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. 
- नितीन नार्वेकर, 
मुख्याधिकारी, नगरपालिका, जालना 
----------- 
नगरपालिकेच्या हद्दीत बससेवा सुरू करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा लागतो. त्यांचा प्रस्ताव आणि परवानगीनंतर एसटी महामंडळातर्फे बससेवा सुरू करण्यात येते. तीस वर्षांपूर्वी शहरासह आसपासच्या गावांसाठी ग्रामीण बससेवा सुरू होती. विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी अनेक ठिकाणी थांबे होते. 
- पंडित चव्हाण, 
आगार व्यवस्थापक, जालना 
----------- 
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. बसथांबा नसल्याने एसटी बस थांबत नाहीत. त्यामुळे गैरसोय होते. खासगी वाहनांमध्ये सुरक्षेची काळजी असते. त्यामुळे या मुलींच्या शिक्षणासाठी बससेवा लवकर सुरू व्हायला पाहिजे. 
- मिताली गिते, विद्यार्थिनी, शासकीय तंत्रनिकेतन 
----------- 
वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी कॉलेज हे शहराबाहेर आहेत. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास खर्चाचा ताण पडतो. त्यात खासगी वाहनांतून प्रवास करताना कुचंबणा होते. 
- स्वाती शेळके, 
विद्यार्थिनी, शासकीय तंत्रनिकेतन 
----------- 
शहराची वाढती लोकसंख्या व विस्तारीकरण पाहता शहरांतर्गत बससेवा अत्यंत गरजेची आहे. येथील रिक्षाचालकांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होत असते. त्याचबरोबर क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसवून प्रवाशांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. बससेवा सुरू झाल्यास यास आळा बसेल, नागरिकांचे आर्थिक नुकसानही होणार नाही. 
- शंकर कापसे, नागरिक. 
------------ 
भाजीपाला विक्रीसाठी रोज शहरात जावे लागते. खासगी वाहने मनमानी भाडे घेतात. शहर बस नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास करण्याशिवाय पर्याय राहत नाही. 
- नवनाथ शेरे, 
भाजीपाला उत्पादक शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No citybus in Jalna