भरपाई नाही, विमाही मिळेना

सयाजी शेळके
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

  • जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच 
  • 95 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल
  • मदत मिळत नसल्याने शेतकरी हताश
  • मेडसिंगा येथील शेतकरी संतोष शित्रे यांची आत्महत्या

उस्मानाबाद : जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर हेक्‍टरी आठ हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे. नुकसानभरपाई अथवा विमाही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा मदतीकडे लागल्या आहेत. त्यातच शेतकरी आत्महत्येचे सत्र मात्र थांबत नाही. 

सोयाबीनला भाव मिळेना 
जिल्ह्यात दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना यंदा अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. यामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक हातचे गेले आहे. तर अतिपावसाने काळे पडलेल्या सोयाबीनला बाजारात भाव ही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. 95 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल गेल्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना हेक्‍टरी मदत देण्याचे जाहीर केले आहे; मात्र अद्यापही प्रत्यक्ष मदत जिल्हा स्तरावर प्राप्त झालेली नाही. 

संबंधित बातमी -   'ऑपरेशन लोटस'वर 'पवार पॉवर' भारी !

शेतकऱ्यांमध्ये संताप 
विशेष म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप विमाही मिळालेला नाही. अतिपावसाने नुकसान झाल्यानंतर तत्काळ विमा मिळणे अपेक्षित होते; मात्र विमा कंपन्यांकडून याबाबत कोणतीही उपायोजना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग कंपन्यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. रब्बी पिकांच्या पेरणी, खतांसाठी हातउसने केलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची आशा होती; मात्र पेरणीनंतर मदत मिळत नसल्याने शेतकरी हताश होत आहे. त्यात पुढारी मंडळी सत्तेच्या सारीपाटावर मग्न आहेत. शेतकरी बेदखल होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली अन या गावात झाली मारामारी

शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच 
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. रविवारी (ता. 24) मेडसिंगा येथील शेतकरी संतोष शित्रे यांनी गळफास घेऊन जीवन संपविले आहे. नापिकी आणि अवकाळी पावसामुळे आर्थिक नुकसान झाले. त्यात कर्जाचा बोजा असल्याने शित्रे यांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. 

 

आर्थिक मदतीची मागणी वरिष्ठ स्तरावर केली आहे; मात्र अद्याप मदत मिळालेली नाही. येत्या दोन-तीन दिवसांत बजेट मिळण्याची आशा आहे. मदत मिळताच तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल. 
- राजेंद्र खंदारे, निवासी उपजिल्हाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No compensation, no insurance