पिशोरच्या सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

पिशोरच्या सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

पिशोर (जि.औरंगाबाद) ः पिशोर (ता. कन्नड) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण मोकासे यांच्यावर शनिवारी (ता. 16) दोन तृतीयांश बहुमताने अविश्वास ठराव पारित करण्यात आला. सतरापैकी बारा ग्रामपंचायत सदस्यांनी विविध आरोप करीत सरपंच नारायण मोकासे यांच्याविरुद्ध सोमवारी (ता. 12) तहसीलदार संजय वारकड यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केलेला होता.

अविश्वास ठरावाच्या निवेदनावर स्वाक्षरी करणारे सर्व सदस्य सोमवारपासून अज्ञात ठिकाणी सहलीवर निघून गेले होते. शनिवारी (ता.16) दुपारी दोन वाजता सर्व बारा सदस्य विशेष वाहनाने ग्रामपंचायत कार्यालयात हजर झाले. तहसीलदार संजय वारकड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष सभेत चर्चा होऊन तेरा विरुद्ध एक मताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. सतरा सदस्यांपैकी तीन सदस्य अनुपस्थित राहिले. विद्यमान सदस्य बाळासाहेब जाधव यांनी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडला आणि अशोक जाधव यांनी त्यास अनुमोदन दिले.

एजाज पठाण, उमेश मोकासे आणि सरपंच नारायण मोकासे यांनी चर्चेद्वारे आपापली मते मांडली. अविश्वास ठरावावर हात वर करून पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत उपसरपंच अरुण सोनवणे, सदस्य उमेश मोकासे, नारायण खडके, किसन मोकासे, एजाज पठाण, कविता शेजवळ, शांताबाई दवंगे, अनिता मोकासे, अशोक जाधव, रेणाबाई सुरडकर, सुमनबाई परदेशी आणि महेमुदाबी शेख या तेरा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले.

सविताबाई टेपळे, सिंधूबाई नवले आणि निर्मलाबाई मोकासे हे तीन ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी सुधाकर घुले, मंडळ अधिकारी श्री. बेडवाल, तलाठी दीपाली बागूल, रमेश चव्हाण, कोतवाल हरुण शेख, रशीद चिता हे हजर होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शीघ्र कृती दलाच्या सोळा जवानांच्या तुकडीसह सहायक पोलिस निरीक्षक जगदीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com