विहामांडवा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

विहामांडवा (ता. पैठण) ग्रामपंचायतीच्या सरपंच रुख्मिणीबाई प्रभाकर नवपुते यांच्याविरुद्ध सतरापैकी तेरा सदस्यांनी शनिवारी (ता.21) तहसीलदारांकडे अविश्‍वास ठराव दाखल केला. त्यावर चर्चा करण्यासाठी 26 सप्टेंबरला विशेष सभा बोलावण्यात आली आहे.

विहामांडवा (जि.औरंगाबाद) ः विहामांडवा (ता. पैठण) ग्रामपंचायतीच्या सरपंच रुख्मिणीबाई प्रभाकर नवपुते यांच्याविरुद्ध सतरापैकी तेरा सदस्यांनी शनिवारी (ता.21) तहसीलदारांकडे अविश्‍वास ठराव दाखल केला. त्यावर चर्चा करण्यासाठी 26 सप्टेंबरला विशेष सभा बोलावण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विहामांडवा ग्रामपंचायतींतर्गत धुसफूस चालू होती. तिचे पर्यवसान अखेर सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात झाले. ही तालुक्‍यातील मोठी ग्रामपंचायत असून, एकूण सतरा सदस्य आहेत. सरपंच रुख्मिणीबाई प्रभाकर नवपुते विराजमान आहेत. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला. त्यात नमूद केले, की सरपंच रुख्मिणीबाई नवपुते या इतर सदस्यांना अवमानकारक वागणूक देतात.

विकासकामात इतरांना विश्‍वासात न घेता मनमानी करतात. त्यांचे पुत्र सतत ग्रामपंचायतीच्या कामात हस्तक्षेप करतात. वेळप्रसंगी इतर सदस्यांना अरेरावीची भाषा करतात. यावर ग्रामपंचायत सदस्य महावीर काला, शेख इक्‍बाल, सुनील डुकरे, सावता हाकम, बापूराव ब्रह्मराक्षस, दत्ता झुंजे, सीमा शेख, संगीता गाभूड, कल्पना पवार, सिमरन शेख, लीलावती शेजूळ, शारदा येळे, जिजाबाई ब्रह्मराक्षस आदी तेरा सदस्यांच्या सह्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Confidence Motion On Vihamandava Sarpanch