बंधारे तर बांधले; पण गेट लावायला विसरले!

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

चापोली - चाकूर तालुक्‍यातील हिंपळनेर गावातून वाहणाऱ्या नदीवर लिंबवाडी ते हिंपळनेर या दोन गावांदरम्यान पाच कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत; मात्र एकाही बंधाऱ्याला गेट नसल्याने पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. 

यंदा जून-जुलैत व परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतशिवारातील नदी- नाले तुडुंब भरून वाहिले. पाटबंधारे विभागाकडून हिंपळनेर ते लिंबवाडीदरम्यान रामप्रभू उडगे, नागनाथआप्पा व्हत्ते, ज्ञानोबा शिंदे, खंडेराव सूर्यवंशी व सुधाकर माने या पाच शेतकऱ्यांच्या शेताशेजारील नदीवर पाच कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. बंधारा बांधून सहा ते सात वर्षे झाली तरी आजतागायत या बंधाऱ्याला गेट बसविण्यात आले नाही. या बंधाऱ्यात साधारणतः चार मीटरपर्यंत व अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत दूरवर पाणी साठण्याची क्षमता आहे. 

शासनाच्या वतीने दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवारसारखी योजना राबविल्या जात आहेत. त्या माध्यमातून पाणी अडवून पाणीपातळी वाढविण्यात येत आहे; परंतु दुसरीकडे हिंपळनेर व लिंबवाडी शिवारात कोल्हापुरी बंधारे उपलब्ध असताना केवळ गेट नसल्याने पाणी वाहून गेले असून बंधारा कोरडाठाक पडला आहे. पाणी अडले असते, तर 400 ते 450 एकरांवरील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सिंचनासाठी लाभ झाला असता. 
 
Web Title: no gates installed after seven years of construction of dam