SUNDAY_SPECIAL : औरंगाबादमधील या बॅंकेत मिळते बिनव्याजी कर्ज! (Video)

शेखलाल शेख
Sunday, 10 November 2019

औरंगाबाद - प्रेषित मोहंमद पैगंबर, कुराण शरीफच्या शिकवणीनुसार इस्लाम धर्मात व्याज देण्यास-घेण्यास थारा नाही. याच शिकवणीच्या आधारे प्रत्यक्षात बिनव्याजी व्यवस्था असलेली 'अल खैर बैतुल माल' ही नागरी सहकारी पतसंस्था 2002 पासून औरंगाबाद शहरात यशस्वीपणे कार्यरत आहे.

औरंगाबाद - प्रेषित मोहंमद पैगंबर, कुराण शरीफच्या शिकवणीनुसार इस्लाम धर्मात व्याज देण्यास-घेण्यास थारा नाही. याच शिकवणीच्या आधारे प्रत्यक्षात बिनव्याजी व्यवस्था असलेली 'अल खैर बैतुल माल' ही नागरी सहकारी पतसंस्था 2002 पासून औरंगाबाद शहरात यशस्वीपणे कार्यरत आहे.

'जमाते इस्लामी हिंद'च्या माध्यमातून 2002 पासून 'अल खैर बैतुल माल' या नागरी सहकारी पतसंस्थेने बिनव्याजी व्यवहार करणारी व्यवस्था निर्माण केली शिवाय ती यशस्वीसुद्धा केली. या खात्यात खातेधारकांना पैसे ठेवता येतात; मात्र त्यावर व्याजाचे कोणतेच व्यवहार होत नाहीत. इतकेच नव्हे कर्जसुद्धा बिनव्याजी आहे; मात्र त्याला काही अटी आहेत. 

अल खैर बैतुल माल पतसंस्थेने 2002 पासून 11 हजार 95 लोकांना तब्बल 36 कोटी 93 लाख 92 हजार 560 रुपयांच्या कर्जाचा लाभ दिला. यातून सध्या 7 कोटी 21 लाखांचे कर्ज वितरित केलेले आहे.


बॅंकेचे प्रवेशद्वार

अनेकांच्या प्रयत्नातून सुरू झाली पतसंस्था 

इस्लाम धर्मात व्याज देण्या-घेण्यास थारा नाही. त्यामुळे इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार जमाते इस्लामी हिंदच्या माध्यमातून सुरवातीला 400 पेक्षा जास्त जणांनी शेअर्स जमा केले. शेअर्स जमा झाल्यानंतर औरंगाबादेतील युनूस कॉलनी कटकटगेट येथे "अल खैर बैतुल माल' या नागरी सहकारी पतसंस्थेची सुरवात झाली. पहिल्या वर्षी सोसायटीने 20 हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यास सुरवात केली होती. नंतर 25 हजार तर आता सध्या पतसंस्था दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. पतसंस्थेकडे सध्या सात हजार 550 खातेधारक आहेत. यामध्ये बचत खातेदार आहे जे पतसंस्थेत आपल्या खात्यावर पैसे जमा करतात; मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याजाचे व्यवहार होत नाहीत.

शिक्षण, आरोग्य, लग्नासाठी सर्वाधिक कर्ज 

येथे खातेदार, गरजू नागरिकांना शिक्षण, लग्न, आरोग्य अशा विविध कारणांसाठी जास्तीत जास्त दीड लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यासाठी कर्ज घेणाऱ्याला सोने पतसंस्थेत ठेवावे लागते. सोन्याची जी किंमत असेल त्याच्या 75 टक्के रकमेपर्यंत रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. घेतलेले कर्ज दहा महिन्यांत म्हणजेच समान दहा हप्यात फेडणे अनिवार्य आहे. कर्ज घेताना दीड लाख रुपये कर्ज घेतले असेल तर त्यासाठी 1 हजार 880 रुपये प्रोसेसिंग शुल्क म्हणून घेतले जातात. या व्यतिरिक्त कोणताही खर्च कर्जदाराला करावा लागत नाही. मात्र, सोने असल्याशिवाय हे कर्ज मिळत नाही. सध्या पतसंस्था प्रत्येक महिन्याला 250 जणांना कर्ज देते. यामध्ये सर्वाधिक कर्ज हे शिक्षण, आरोग्य, लग्नासाठी घेतले जाते. 
 

कर्ज देण्याची पद्धत अतिशय सोपी, सहज असल्याने येथे कर्ज घेणाऱ्यांची संख्या खूप आहे. येथे 1600 रुपये भरून खाते उघडता येते. तसेच हजला जाणारे भाविकसुद्धा येथे खाते उघडून त्यात प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात. हजला जाण्याइतपत रक्कम झाली, की ती खातेदार काढतात.'
- हाफीज सय्यद हबीबउल्ला, व्यवस्थापक, अल खैर बैतुल माल', नागरी सहकारी पतसंस्था, औरंगाबाद. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Interest on loan in Al-Khair Batul Mall Bank Aurangabad