पोस्टात दुपारपर्यंत 'नो मनी' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे त्या बदलण्यासाठी नागरिकांनी पोस्टात मोठी गर्दी केली होती. गुरुवारी (ता.17) रोख रक्कम येण्यासाठी वेळ लागल्याने नागरिक दुपारपर्यंत एकाच ठिकाणी वाट पाहत होते. 

औरंगाबाद - हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे त्या बदलण्यासाठी नागरिकांनी पोस्टात मोठी गर्दी केली होती. गुरुवारी (ता.17) रोख रक्कम येण्यासाठी वेळ लागल्याने नागरिक दुपारपर्यंत एकाच ठिकाणी वाट पाहत होते. 

जुनाबाजारातील मुख्य पोस्ट ऑफिसात दुपारपर्यंत नोटा उपलब्ध नसल्याने येथे लोकांची मोठी गर्दी झाली होती. पोस्टात आल्यावर संबंधित कार्यालयातील शिपाई आज नोटा बदलून देण्यात येणार नसल्याचे नम्रपणे सांगत होते. या कार्यालयात नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या वृद्धांसाठी आणि दिव्यांगासाठी स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या होत्या; मात्र नोटा बदलून मिळणार नसल्याने रांगेतील नागरिक ताटकळले होते. किती वेळ लागणार या प्रश्‍नावर शहागंज येथील स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेतून आम्हाला नोटा मिळाल्या नाहीत, असे उत्तर दिले जात होते. रोज येणारी रोकड तुटपुंजी असल्याने अद्यापही पोस्ट, एटीएम, बॅंकेतील रांगा कमी होताना दिसत नाहीत. बचत खाते उघडून आपली रक्कम त्यात जमा करण्याचे पोस्ट कार्यालयाने केलेले आवाहन परिणामकारक ठरले असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बचत खाते उघडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. औरंगाबादेतील मुख्य पोस्ट कार्यालयात कामाचा अतिरिक्त ताण आणि कामाचे तास वाढल्यामुळे अन्य पोस्ट कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. 

Web Title: No Money to post untill afternoon