आता ‘तिची’ वाट पाहत थांबण्याची गरज नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

- रेल्वे क्रासींग गेटवरून उड्डाण पुलाच्या कामाला सुरवात
- अखेर २५ वर्षापासूनची मागणी लागली मार्गी
- विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार

परभणी : तासनतास ‘तिची’ वाट पाहावी लागते. ती कधी लवकर येते तर कधी वेळ लावते. जरी ती आली तरी समोरच उभी राहते. तिची जशी येण्याची सर्व जन वाट पाहतात तशीच ती लवकर जावी याची देखील वाट पाहिली जाते. परंतू, ती पण हट्टी कधी जाते तर कधी जातच नाही. मग तिच्या जाण्याची वाट पाहत बसावे लागते. परंतू, आता आता ती केव्हा ही आली तरी तिची वाट पाहत थांबण्याची गरज लागणार नाही. आता तुम्ही म्हणाल ‘ती’ आहे तरी कोण? ही कोण्या युवतीची गोष्ट नाही तर ‘ती’ रेल्वेगाडीची आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे जाणाऱ्या रेल्वे क्रासींगवर दररोज घडणारी ही घटना. परंतू आता यापासून मुक्ती मिळणार आहे. कारण रेल्वे क्रासींग गेटवरून उड्डाण पुलाच्या कामाला सुरवात झाली आहे.

रेल्वेस्थानकाला लागूनच असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गेटवर उड्डाणपूल तयार करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. या गेटवर उड्डाणपूल करणे अत्यंत गरजेचे होते. कारण या मार्गावर दररोज हजारो वाहनधारकांची ये-जा असते.  कृषी विद्यापीठातील सर्वच महाविद्यालयांसह कार्यालय, संशोधन संस्था, पशुवैद्यकीय महाविद्यालय, नवोदय विद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय यासह विद्यापीठापलीकडील १५ ते २० गावांचा संपर्क कृषी विद्यापीठाच्या मार्गेच होत असतो. साखला प्लॉट मार्गे एक पर्यायी रस्ता परंतु, तोही विद्यापीठातूनच जात असल्याने या रेल्वे गेटवर पुलाची आवश्यकता होती. रेल्वेस्थानक जवळच असल्याने दररोज येणाऱ्या ४० व जाणाऱ्या ४० अशा ८० गाड्यांचा प्रवास या मार्गावरून होतो. त्यामुळे सातत्याने रेल्वे गेट बंद राहते. याचा परिणाम सर्वांनाच ताटकळत राहण्यात होत होता. 

तब्बल दहा तास रेल्वे गेट बंद
अलिकडील काळात परभणी ते पूर्णा मार्गावर दुहेरीकरण झाल्यामुळे गाड्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे तर २४ तासांमध्ये तब्बल १० तास हे गेट बंद राहत होते. यावर उड्डाणपूल हाच पर्याय होता. उड्डाणपुलाची मागणी तशी जुनीच होती. रेल्वे प्रशासनाने अलिकडील काळात त्याची दखल घेऊन रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला होता. प्राथमिकस्तरावर पुलाचे डिझाइन करून तो उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

आराखड्यास मान्यता

रेल्वे बोर्डाने यास मान्यता दिल्यानंतर प्रथम या भागातील मातीची तपासणी करण्यात आली. खडक, मुरूम याचा अंदाज शास्त्रीयदृष्ट्या घेण्यात आला. बोअर मशीनच्या माध्यमातून हे काम मार्चमध्ये पूर्ण करण्यात आले होते. दोन्ही बाजूंनी बोअर पाडून तपासणी करण्यात आली. मातीचा दर्जा तपासण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष पुलाचा आराखडा तयार करण्यात आला. त्या आराखड्यास मान्यता मिळून पुलाच्या कामास सोमवारी सुरवात झाली. परभणीतील कृषी विद्यापीठाच्या गेटवरील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागला असून सोमवारपासून उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली आहे.

विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार
कृषी विद्यापीठाचा परिसर खूप मोठा आहे. शैक्षणिक कामांसह संशोधन संस्थाही मोठ्या प्रमाणात आहेत. देशभरातून विद्यार्थी या ठिकाणी दाखल होत असतात. परंतु, सातत्याने विद्यापीठातून जाणारे दोन्ही गेट बंद राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती. खेड्यातून दररोज येणाऱ्या ग्रामस्थांचीही मोठी गैरसोय होत होती. विद्यापीठात वर्षभर नियमित मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा स्थितीत सर्वांनाच या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. उड्डाणपुलामुळे या गैरसोयी दूर होणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No need to wait for 'her' anymore