लातुरात टाळेबंदी तीनमध्ये सुरक्षा उपाययोजनांचे तीनतेरा, पालकमंत्र्यांची चिंता

विकास गाढवे
Tuesday, 5 May 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील टाळेबंदीत सोमवारी (ता.चार) सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिली. याचा फायदा घेत लातूर शहर व जिल्ह्यातील नागरिक विविध कारणांसाठी बाहेर पडले. यामुळे सुरक्षित शारीरिक अंतर व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांचे तीनतेरा वाजले. जाणकारांनी याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी हा विषय गंभीरतेने घेत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना बोलून उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील टाळेबंदीत सोमवारी (ता.चार) सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिली. याचा फायदा घेत शहर व जिल्ह्यातील नागरिक विविध कारणांसाठी बाहेर पडले. यामुळे सुरक्षित शारीरिक अंतर व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांचे तीनतेरा वाजले. जाणकारांनी याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी हा विषय गंभीरतेने घेत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना बोलून उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

तिसऱ्या टप्प्यातील टाळेबंदीत हिरवा आणि नारिंगी क्षेत्रामधील जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय तसेच अन्य कामकाजासाठी थोडी शिथिलता देण्यात आली आहे. यात गर्दी टाळून सुरक्षित अंतर पाळून व्यवहारास मुभा देण्यात आली आहे. मात्र, सोमवारी सुरक्षा नियमांचे पालन न करता लोक रस्त्यावर आले. सर्वच दुकाने आणि अन्य ठिकाणी गर्दी दिसून आली. दारूच्या दुकानासमोर तर झुंबड उडाल्याचे चित्र होते. गर्दी व गोंधळ लक्षात घेता टाळेबंदी सुरू आहे, याची जाणीवही होत नव्हती.

तांड्यांवर अन्न अन् पाणी नाही, जळकोट तालुक्यातील चित्र

या परिस्थितीत शहर आणि जिल्ह्यातील सुजाण व जाणकार मंडळींनी चिंता व्यक्त करून यापुढे अशीच परिस्थिती राहिल्यास ती कोरोनाला निमंत्रणच ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. याची माहिती बहुतांश लोकांनी पालकमंत्री देशमुख यांना दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत सोमवारी जिल्हाभरात उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. थोडीशी शिथिलता दिली असली तरी सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. रस्त्यावरील अनावश्यक गर्दी, दुकानांमध्ये कोणतीच सुरक्षा साधने न वापरणे, सुरक्षित अंतर न पाळणे हे लातूरसाठी धोकादायक आहे. दीड महिना सांभाळलेले वातावरण आता संयम सोडून घालवू नये, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.

Breaking News ः उदगीरमध्ये आणखी एक जण कोरोनाबाधित

धोका टळलेला नाही
लातूर जिल्हा ऑरेंज क्षेत्रात असला, तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क व रुमालाचा वापर करावा. गर्दी करू नये, सुरक्षित अंतर पाळावे, साबणाने वारंवार स्वच्छ हात धुवावेत, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, घरातूनच ऑनलाइन कामे करावीत, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून टाळेबंदीच्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी व जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद ठेवा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Norms Follow During Lock Down In Latur, Said Guardian Minister