मराठवाड्यावरच पावसाचा रुसवा, तलाव कोरडे

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मराठवाड्यात ऊर्ध्व भागातून जायकवाडीत पाणी येत असले तरी या भागातील बहुतांश ठिकाणची पिके तहानलेलीच आहेत. 

औरंगाबाद - राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने महत्त्वाच्या धरणांचे दरवाजे उघडण्याची वेळ आली. मात्र, मराठवाडा कोरडाच आहे. धरणे कोरडी असल्याने टॅंकरने होणारा पाणीपुरवठा, पिकांना आवश्‍यक तेवढा पाऊस नसल्याने त्यांची खुंटलेली वाढ, हे प्रश्‍न येथील परिस्थिती सांगण्यास पुरेसे आहेत. ऊर्ध्व भागातून जायकवाडीत पाणी येत असले तरी या भागातील बहुतांश ठिकाणची पिके तहानलेलीच आहेत. 

मागील आठ दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावत असताना मराठवाडा मात्र तसा कोरडाच आहे. मुंबईपाठोपाठ नाशिक, सांगली अशा पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणातील अनेक नद्यांना पूर येत आहेत. तसेच त्या भागांतील महत्त्वाच्या धरणांचे दरवाजे उघडण्याची वेळ आलेली आहे. असे असताना मराठवाड्यात अपेक्षित सरासरी 375 मिलिमीटर हवी होती. मात्र 260 मिलिमीटर एवढाच पाऊस झालेला आहे. आजपर्यंतच्या अपेक्षित पावसाशी प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची टक्‍केवारी 69 टक्‍के एवढीच आहे. 

पावसाने यंदाही चांगलाच हात दाखवला आहे. वेळीच मशागत करून पेरणीसाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना पूर्वमोसमी पावसाने दगा दिल्याने मॉन्सूनच्या पावसावरच पेरण्या केल्या. गेल्या दोन आठवड्यांपासून कमी-अधिक अशी भुरभुर पाहायला मिळते आहे. मराठवाड्यात एक जून ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत सरासरी 779 मिलिमीटर पर्जन्यमानाची सरासरी असते. मात्र, ही सरासरी पूर्ण होत नाही, असाच अनुभव येतो आहे. 

जिल्ह्यातील फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे बऱ्यापैकी पाऊस झाला. अन्य तालुक्‍यांतील स्थिती गंभीरच आहे. आवश्‍यक तेवढा पाऊस न झाल्याने पिकांची वाढही खुंटलेली आहे. त्यामुळे आगामी काळात चांगला पाऊस झाला तरी पिकांना चांगला उतारा येईलच असे नाही. आजही मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद येथे 96 चारा छावण्या सुरूच ठेवाव्या लागल्या आहेत. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी मराठवाड्यातील 302 गावे-वाड्यांवरील आठ लाख 37 हजार 750 ग्रामस्थांना आजही 430 टॅंकरच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे लागत आहे. 
 
विहिरी कोरड्या 
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले. तरीही अपेक्षित पाऊस न झाल्याने विहिरींना पाणी नाही. पहिल्या टप्प्यात म्हणजे जूनमध्ये चांगला पाऊस झाला तर लगेच विहिरींना पाणी येत असते. त्यामुळे पुढे पावसात खंड पडला तरी शेतकरी विहिरीतील पाणी पिकांना पंपाद्वारे देतात. मात्र, इथे ऑगस्ट सुरू होऊन आठवडा लोटत आहे, तरीही अपेक्षित पाऊस नाही. त्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या आहेत. 
 
नागपंचमीला मुगाला शेंगा असायच्या 
 वेळीच पेरणी झाल्यानंतर चांगला पाऊस झाला की पिके तरारून येत असत. सोमवारी (ता. पाच) नागपंचमी झाली. या दिवसापर्यंत मुगाला शेंगा (वाध्या) लागल्याचे सर्रास बघायला मिळत असे. मात्र, यंदा मुगाची वाढच खुंटल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुगाला फुलेही बघायला मिळेनाशी झाली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No rain in Marathwada