उपक्रम चांगला, अडचणींनी पांगला! 

संकेत कुलकर्णी
शुक्रवार, 28 जून 2019

औरंगाबाद : वन विभागाने मोठ्या मशक्कतीने सुरू केलेले वनधनाच्या विक्री दुकानाची "कधी सुरू, कधी बंद' अशी अवस्था झाली आहे. आडवाटेवरील जागा, अनिश्‍चित वेळा आणि पुरेशा प्रसिद्धीअभावी गिऱ्हाईकांची वानवा यामुळे या चांगल्या उपक्रमाला अजूनही पुरेसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. 

औरंगाबाद : वन विभागाने मोठ्या मशक्कतीने सुरू केलेले वनधनाच्या विक्री दुकानाची "कधी सुरू, कधी बंद' अशी अवस्था झाली आहे. आडवाटेवरील जागा, अनिश्‍चित वेळा आणि पुरेशा प्रसिद्धीअभावी गिऱ्हाईकांची वानवा यामुळे या चांगल्या उपक्रमाला अजूनही पुरेसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. 

पंतप्रधानांनी केंद्रीय पातळीवर घोषणा केल्यानंतर राज्यातही वनमंत्र्यांनी वन विभागाच्या प्रत्येक सर्कल हेडक्वार्टरला अशी वनधन-जनधन किरकोळ विक्री केंद्रे स्थापन करण्याचे आदेश दिले. रेल्वे स्टेशन रस्त्यावरील कार्यालय परिसरात वन विभागाने हे केंद्र गेल्यावर्षी उभारले; पण मंत्र्यांना वेळ न मिळाल्याने उद्घाटनाअभावी वर्षभर ते कुलुपबंद राहिले. अखेर पंधरा दिवसांपूर्वी मंत्र्यांच्या हस्ते या एअर कंडिशन्ड केंद्राचे उद्घाटन झाले. अजिंठा डोंगररांगेत बिबा, मध, मोहफुले आणि तत्सम रानमेव्यावर प्रक्रिया करणाऱ्या महिला बचत गटांना वाव मिळावा, यासाठी हे काम सिल्लोडच्या चंडिका माता समाजप्रबोधन बहुद्देशीय संस्थेला देण्यात आले. सरकारी प्रथेप्रमाणे केंद्र सुरू झाले खरे; पण नागरिकांना याचा पत्ताच न लागल्यामुळे इथे ग्राहकांची संख्याही किरकोळच राहिली. पुरेसा प्रतिसाद नसल्यामुळे केंद्र चालवण्यात संस्थेला अडचणी येत असल्याचे या संस्थेचे संचालक दादाराव डफळ यांनी सांगितले. आर्थिक पाठबळ आणि पुरेसे प्रसिद्धीसहाय्य मिळाल्यास आणखी उत्पादनांनी हे केंद्र सजवू, असेही ते म्हणाले. 

इथे काय काय मिळते?

अजिंठा डोंगररांगेतील रानातून डिंक, मध, चारोळी, बिबा, बांबू, सीताफळ, डिकीमाली, मुरडशेंग, आवळा, बेहडा, हिरडा, रोशा गवत, गुंज व पाला, करंज बी, निंबोळी, आंबा तसेच इतर वनौषधी या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आदिवासी महिलांच्या बचत गटांनी बिब्यावर प्रक्रिया करून बनवलेल्या वस्तू, गोडंबी, बिब्याची चॉकलेट्‌स, चिक्की, बांबूपासून बनवलेल्या वस्तू इथे ठेवण्यात आल्या आहेत. सकाळी साडे दहा ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते सायंकाळी साडे पाच या "ऑफिशियल' वेळेत, "केंद्र चालू असल्यासच' ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात.  

वनसंपत्तीचे संरक्षण आणि त्यातून रोजगार निर्मिती, यासाठी हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला आहे. या ठिकाणी बिब्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र केंद्र उभारले जाणार असून, त्यासाठी वीस लाखांचा निधीही मंजूर झाला आहे. हळू हळू नागरिकांमध्ये प्रसिद्धी होईल, तशी ग्राहकसंख्याही वाढेल. वन विभागाने इन्फ्रास्ट्रक्‍चर उभे करून दिले आहे. आता पुढे हे केंद्र चालवण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची आहे. 
- प्रकाश महाजन, मुख्य वनसंरक्षक. 

वन विभागाने आम्हाला भरपूर मदत केली आहे. मात्र, हे केंद्र चालवण्यासाठी आणखी आर्थिक पाठबळ आणि प्रसिद्धीची गरज आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या उपक्रमाची आणखी प्रसिद्धी झाली पाहिजे. व्यावहारिकदृष्ट्या सध्या हे केंद्र चालवण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्या दूर झाल्या, तर इथे आणखी वेगवेगळी उत्पादने आणता येतील. 
- दादाराव डफळ, संचालक, चंडिका माता बहुद्देशीय समाजप्रबोधन संस्था, सिल्लोड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no response to vandhan scheme by government in aurangabad