मुख्यमंत्र्यांची पैठणला सभा, तरीही हाती "भोपळा' 

शेखलाल शेख - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - तुम्ही कितीही मोठ्या नेत्यांची सभा घ्या, पदयात्रा काढा, फेरी काढा, पार्ट्या द्या, उमेदवार किती ही दिग्गज असू द्या, पाण्यासारखा पैसा खर्च करा, मात्र उमेदवारांच्या मनात जो उमेदवार आहे, त्यालाच निवडून देणार हे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालावरून दिसले. 

औरंगाबाद - तुम्ही कितीही मोठ्या नेत्यांची सभा घ्या, पदयात्रा काढा, फेरी काढा, पार्ट्या द्या, उमेदवार किती ही दिग्गज असू द्या, पाण्यासारखा पैसा खर्च करा, मात्र उमेदवारांच्या मनात जो उमेदवार आहे, त्यालाच निवडून देणार हे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालावरून दिसले. 

कॉंग्रेस पक्षाने तीन माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज पवार, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मैदानात उतरवूनही हवे तेवढे यश मिळाले नाही. तर भाजपमध्ये पैठण तालुक्‍यातील बिडकीनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतली, मात्र पैठणमध्ये भाजपच्या हाती भोपळा आला. "राष्ट्रवादी'ने सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांच्या सभा घेतल्या मात्र राष्ट्रवादीला जिल्ह्यात अपयश आले. त्यामुळे मतदारांच्या निर्णयापुढे कोणाचे काहीही चालेना, अशी स्थितीत जिल्ह्यात दिसून आली आहे. 

युतीचा काडीमोड झाल्यानंतर भाजप, शिवसेना यांनी सर्वच 62 गटांत तयारी करून उमेदवार दिले होते. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने गंगापूर, वैजापूरमध्ये आघाडी केली. कन्नडमधील दोन गटांत आघाडी करून उमेदवार दिले. आपल्याच पक्षाचे उमेदवार विजयी होण्यासाठी चारही प्रमुख पक्षांनी जिवाचे रान करून प्रचार केले. 

भाजपने जोर लावत पैठण तालुक्‍यातील बिडकीन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जिल्ह्यासाठी सभा घेतली. मात्र पैठण तालुक्‍यात भाजपचे पानिपत झाले. नऊ गटांपैकी त्याच्या हाती भोपळा आला. जेथे सभा झाली त्या बिडकीन गटात मनसेचे विजय चव्हाण विजयी झाले. येथे शिवसेनेने मुसंडी मारत सात जागा जिंकल्या, कॉंग्रेसच्या वाट्यास एक जागा आली. 

भाजपने पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सभा घेतल्या. पैठणमध्ये अपयश आले असले तरी त्यांना जिल्ह्यात इतर ठिकाणी लक्षणीय यश मिळाले. 

कॉंग्रेस पक्षाने ही पुन्हा सत्ता राखण्यासाठी जोर लावत तीन माजी मुख्यमंत्री यांना मैदानात उतरविले. अशोक चव्हाण यांची देवगाव रंगारी, करमाड येथे सभा झाली, पृथ्वीराज चव्हाण यांची महालगाव वैजापूर, तिसगाव, गणोरी फुलंब्री येथे तर नारायण राणे यांची कन्नडमधील बाजारसावंगी येथे सभा झाली. विखे पाटील यांनी वैजापूर, गंगापूरमध्ये सभा घेतली. 

माजी मंत्री आरिफ नसीम खान यांची देवगाव रंगारी, करमाड येथे तर नितीन राऊत यांची आपेगाव, करमाड येथे सभा झाली. कॉंग्रेसच्या देवगाव रंगारी येथे सभा होऊन ही भाजप उमेदवार विजयी झाला. नेत्यांना प्रचारात उतरुन ही कॉंग्रेसला हवे तसे यश मिळविता आले नाही. मागील 16 च्या आकड्यावरच ते कायम राहिले. विशेष म्हणजे वैजापूरमध्ये आघाडी करूनही राष्ट्रवादी दोन कॉंग्रेसला 1, अशा तीन जागाच जिंकता आल्या. गंगापूरमध्येही आघाडी होती मात्र येथे भाजपने चार, शिवसेने चार तर एका भाजप पुरस्कृत उमेदवाराचा विजय झाला. 

येथे तर दोन्ही कॉंग्रेसचे पानिपत झाले. त्यांच्या हाती भोपळा आला. राष्ट्रवादीने सुप्रिया सुळे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभा घेतल्या, मात्र घड्याळ तीनच्या आकड्यावर जाऊन अडकले. या सर्वांमध्ये शिवेसेनेचा मोठा नेता सभेला आलेला नसताना ही त्यांनी संघटनेच्या बळावर 18 जागा जिंकल्या. 

एकंदरीत गट, गणांत कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या, पैसा वाटला, कितीही जोर लावला तरी ज्यांना निवडून द्यायचे त्यांनाच मतदारांनी दिले. त्यामुळे नेत्यांच्या जेथे सभा झाल्या तेथील काही गटांतील उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.

Web Title: no seat bjp in marathwada