पालिकेचे अनुदान घेतले; पण स्वच्छतागृह बांधायचे विसरले! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

लातूर - स्वच्छतागृह बांधण्यासाठी महापालिकेकडून अनुदान घेऊनही ते न बांधता उघड्यावर जाणाऱ्या पाच कुटुंबप्रमुखांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यात तीस कुटुंबप्रमुखांनी काही दिवसांत स्वच्छतागृह बांधण्याची लेखी हमी दिली. महापालिकेच्या सहायक आयुक्त वसुधा फड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी (ता. दहा) शहरातील इंडियानगर व अवंतीनगर भागांत ही कारवाई केली. 

महापालिकेच्या कारवाईमुळे अनुदान उचलूनही स्वच्छतागृह न बांधलेल्या कुटुंबांप्रमुखात खळबळ उडाली आहे. अनेकांनी साहित्य खरेदी करून स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्‍त शहर करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. यातूनच स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदान घेऊनही बांधकाम न करणाऱ्या शहराच्या विविध भागातील कुटुंबप्रमुखांवर महापालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यातूनच अशा कुटुंबप्रमुखांचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या पथकाने शहरातील इंडियानगर व अवंतीनगर भागांत शुक्रवारी (ता. दहा) सर्व्हेक्षण केले. यात तब्बल 35 जणांनी अनुदान उचलूनही स्वच्छतागृह बांधले नसल्याचे समोर आले. यापैकी तीस जणांनी काही दिवसांतच स्वच्छतागृह बांधण्याची हमी शपथपत्राद्वारे पथकाला दिली. मात्र पाच जणांनी टाळाटाळ केल्याने त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या सर्वांवर पोलिस कारवाई करण्यात येणार आहे. पथकात स्वच्छता निरीक्षक कलीम शेख, अतिक्रमणप्रमुख सहदेव बोराडे, अभियंता डी. डी. कलवले, महादेव फिस्के यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक इंदीवाड व पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ही मोहिम येत्या काळात सुरूच रहाणार असून अनुदान घेऊन स्वच्छतागृह न बांधणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे सर्व नागरिकांनी तातडीने स्वच्छतागृह बांधकामाला सुरवात करून कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्‍त रमेश पवार यांनी केले.

Web Title: no toilet latur