ना उपचार, ना औषध!

योगेश पायघन
सोमवार, 17 डिसेंबर 2018

औरंगाबाद - मोठा गाजावाजा करून वर्षभरापूर्वी ९ डिसेंबर २०१७ ला लासूर स्टेशन येथे मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिर झाले. यामध्ये ६७,१८० रुग्णांच्या ओपीडीत ६,०७८ रुग्णांना ऑपरेशनची गरज असल्याचे निदान केले; पण आतापर्यंत यातील केवळ २,७५८ रुग्णांच्या शस्त्रक्रिया असून तीन हजारांहून अधिक रुग्णांना उपचार मिळाला नाही. परिणामी, त्यांचा आजार बळावत आहे.

गरजू रुग्णांना उपचार मिळावे, यासाठी चार वर्षांत राज्यात तीसहून अधिक महाआरोग्य शिबिरे झाली. लहान शिबिरांनीही पाचशेचा आकडा ओलांडला. दरम्यान, त्यातील ९० टक्के रुग्णांना स्थानिक धर्मदायी रुग्णालये व एनजीओंच्या मदतीने; तर दहा टक्के रुग्णांना मुंबई-पुण्यात उपचार दिले जाणार असल्याचे सांगितले जात होते; मात्र सर्व महाआरोग्य शिबिरांची बैठक नुकतीच मुंबईत झाली. त्यात आतापर्यंत झालेल्या सर्वच महाआरोग्य शिबिरातील केवळ २५ ते ३० टक्केच शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले.

 अजेंडा पक्षाचा की राज्याचा?
वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य सचिवस्तरावर या महाआरोग्य शिबिरांचा आढावा घेतला जात नाही. शिवाय या शिबिरांत सचिवांच्या अनुपस्थिमुळे हा शासनाचा अजेंडा आहे की पक्षाचा यावरही शंका उपस्थित होत आहे. 

महाआरोग्य शिबिरासंदर्भात नुकतीच मुंबईत बैठक झाली. त्यात अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या निर्देशाने लासूर स्टेशन शिबिराचे मुख्य समन्वयक उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी शिबिरामधील उपचाराचे प्रेझेंटेशन केले. शिबिरातील उपचारासंबंधी अधिष्ठाताच माहिती देऊ शकतील.
- डॉ. मोहन डोईबळे, प्रभारी अधिष्ठाता, घाटी.

तीन महिन्यांचा दावा
या महाआरोग्य शिबिरातील रुग्णांवर तीन महिन्यांत उपचार केले जातील, असा दावा शासनाने केला होता. त्यामुळे जिल्हाभरातील गरजूंनी गर्दी करून या शिबिरात नावनोंदणी केली; पण अद्याप साठ टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेची प्रतीक्षा कायम असून, त्यांच्या मोफत तपासण्याही झालेल्या नाहीत. एवढेच नाही तर झालेल्या शस्त्रक्रियांही खासगी रुग्णालयांत झालेल्या आहेत.

Web Title: No treatment no medicine