काम नाही, तर मतदान नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

जाब विचारण्याचा अधिकार


""लोकशाहीत मतदानाचे पवित्र कार्य करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो त्यांनी पूर्ण केला पाहिजे. परंतु वर्षानुवर्षे नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करुन फक्‍त निवडणुकीत मत मागण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला जाब विचारण्याचा अधिकार देखील जनतेला आहेच. सहनशिलता संपली की, नकारात्मक मानसिकता होते, तशीच नागरिकांची राज्यकर्त्यांबद्दल मानसिकता झाली आहे.''
- उत्कर्ष देवणीकर, स्थानिक नागरिक
 

उमरगा- केवळ आश्‍वासनांवर अनेक वर्षापासून निवडून येणाऱ्या उमेदवारांना रामनगरवासियांनी चांगलाच दणका दिलेला आहे. निवडणुका आल्या की, तीच ती खोटी आश्‍वासने देणाऱ्या सर्वच "राजकीय पक्षांच्या उमेदवारांना रामनगरवासियांनी ""काम नाही, तर मतदान नाही'', असे बजावत नगरपालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांच्या या आक्रमक पावित्र्याने उमेदवारांना मात्र ऐन थंडीत घाम फुटला आहे.

तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 11 मधील रामनगरच्या मतदारांना रस्ते, गटारे व वीजेचा प्रश्‍न सोडविण्याचे नुसते आश्‍वासन दिले जाते. वचननामा, वचकनामा, जाहीरनामा अशा गोंडस नावाखाली मतदारांच्या मुलभूत प्रश्‍नांचे वारंवार भांडवल करुन भ्रमनिरास करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा आता रामनगरातील मतदार चांगलाच समाचार घेत आहेत. या भागात वर्षानुवर्षे रस्ते, गटारे व विजेचे खांब लावलेले नाहीत. पंधरा वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करुनही या भागातील समस्या सोडवणे लोकप्रतिनिधींना जमलेले नाही. त्यामुळे रहिवांशामध्ये प्रचंड चीड आणि संताप आहे. त्यामुळेच मतासाठी झोळी पसरणाऱ्या उमेदवारांसमोर मतदार नकारघंटा वाजवित आहेत. "तुम्ही आमची कामे केली नाहीत, आता आम्ही मतदान करणार नाही', असे बजावत रामनगरवासियांनी निषेध म्हणून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.

 

Web Title: No work, no vote