नोटाबंदी विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर उतरणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

बीड - नोटाबंदीचा निर्णय घेताना कोणतीही पूर्वतयारी न केल्यामुळे शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर उतरणार असून सहा जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, तर रविवारी (ता.आठ) प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार तथा कॉंग्रेसचे बीड जिल्हा निरीक्षक शिवाजीराव कव्हेकर यांनी दिली. 

बीड - नोटाबंदीचा निर्णय घेताना कोणतीही पूर्वतयारी न केल्यामुळे शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेस रस्त्यावर उतरणार असून सहा जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, तर रविवारी (ता.आठ) प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार तथा कॉंग्रेसचे बीड जिल्हा निरीक्षक शिवाजीराव कव्हेकर यांनी दिली. 

येथील विश्रामगृहात कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी (ता.दोन) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. कव्हेकर बोलत होते. या वेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष अशोक हिंगे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सर्जेराव काळे, संजय दौंड, सुरेश हात्ते आदी उपस्थित होते. 

श्री. कव्हेकर म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याची अंमलबजावणी करताना सरकारने कोणतीही पूर्वतयारी केली नाही. यामुळे सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडली. चलन टंचाईमुळे देशभरात दोनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. नोटाबंदीचा त्रास फक्त सामान्यांना झाला असून नोटांसाठी रांगेत श्रीमंत लोक उभे राहिल्याचे दिसले नाही. आठवड्याला 24 हजार रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात चार हजार रुपये द्यायलाही बॅंकेकडे पुरेसा चलन पुरवठा नसल्याचे कव्हेकर यांनी नमूद केले. या निर्णयाचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतीमालाचे भाव गडगडल्याने त्यांच्या संकटात भर पडली आहे. लघु उद्योजकांवरही याचा परिणाम झाल्याने दहा टक्केही व्यवहार झाले नाहीत. सरकार शंभर टक्के कॅशलेस व्यवस्था करण्याचा दावा करीत आहेत; परंतु भारतात हे शक्‍य होणार नसल्याचेही श्री. कव्हेकर यांनी सांगितले. 

अमेरिकेसारख्या प्रगत देशातही 40 टक्के व्यवहार रोखीने होतात, गोबेल्सच्या प्रचार प्रसाराच्या नीतीवर सध्याचे सरकार लोकांची दिशाभूल करीत असून मोदी सरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र रोजगार निर्मिती दूरच उलट बेरोजगारी वाढली असल्याचा आरोप श्री. कव्हेकर यांनी केला. 

आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती 
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पाच ते सात जानेवारीदरम्यान घेण्यात येणार आहेत. कॉंग्रेसचे प्रदेश निरीक्षक सत्संग मुंडे, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सर्जेराव काळे, प्रा. विष्णू सोळंके हे मुलाखती घेणार आहेत. त्यानंतर जिल्हा निवड मंडळ उमेदवारांच्या नावांची यादी राज्य मंडळाकडे पाठविणार आहे. याबाबत कॉंग्रेसच्या जिल्हा समितीची सोमवारी (ता.दोन) कॉंग्रेस कार्यालयात बैठक झाल्याचे शिवाजीराव कव्हेकर यांनी सांगितले. 

Web Title: Notabandi against the Congress on the street