नोटबंदीने 'डेसर्ट कूलर' महागले

अभिजित हिरप
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

कच्च्या मालाचे भाव वाढल्याचा फटका उत्पादकांच्या नफ्यावर बसणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्याही खिशावर तीनशे रुपयांपर्यंत भुर्दंड पडेल. नोटबंदीनंतर उत्पादकांना कच्चा माल खरेदी केल्यावर पैसे अदा करण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी दिला जायचा. आता नगदी पैसे देऊन खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे हातचा राखूनच यावर्षी कमी उत्पादन घेण्यात येत आहे.
- सय्यद अजीम, प्रोप्रायटर, सुविधा डेजर्ट कूलर, मोतीकारंजा

औरंगाबाद : कडाक्‍याच्या थंडीनंतर यंदा फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाळ्याची चाहूल लागली. दिवसेंदिवस अंशाअंशाने तापमानवाढीस सुरवात झाली आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात तापमान किंचित का होईना अधिकच असते. जेव्हा नामांकित कंपनीचे कूलर निकामी होतात, तेव्हा स्थानिक उत्पादकांच्या डेसर्ट कूलरची मागणी वाढते. मात्र, नोटबंदीनंतर कच्च्या मालासह कूलरच्या दरातही 10 ते 25 टक्‍के वाढ झाली आहे.

डेसर्ट कूलरची संकल्पना नागपूरनंतर जुन्या मोंढ्यालगत मोतीकारंजा परिसरात वर्ष 2000 पासून सुरू झाली. डेसर्ट कूलर म्हणजे तिन्ही बाजूंनी फक्‍त लोखंडी आणि गवताच्या जाळीने आच्छादलेला कूलर. तिन्ही बाजूंनी हवा आपल्याकडे ओढून समोरच्या बाजूने गारेगार हवा फेकण्याचे काम हा कूलर करतो. नामांकित कूलरमध्ये तिन्ही बाजू बंद असतात. त्यामुळे कडक उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी डेसर्ट कूलरला प्राधान्य दिले जाते. हे कूलर्स नामांकित कंपन्यांच्या तुलनेत केवळ पंधराशे रुपयापांसून ते पाच हजार रुपयांपर्यंत परवडणाऱ्या किमतीत मिळतात. यात दोन फुटांपासून ते चार फूट आकाराचे कूलर्स असतात. साधारणत: हे कूलर शंभर फुटांपासून सहाशे चौरस फूट हॉल अथवा खोलीसाठी पुरेसे असतात. त्याचप्रमाणे ग्राहकाच्या गरजेप्रमाणेही कूलर बनवून देत असल्याने नागरिकांकडून या कूलर्सला मोठी मागणी असते.

दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यांपासून कच्च्या मालाची खरेदी करून उत्पादनाला सुरवात होते. यंदा ऑक्‍टोबरमध्येच नोटबंदी झाल्याने खरेदी ठप्प झाली. तब्बल तीन महिन्यांनंतर डिसेंबरपासून कच्चा माल खरेदी करण्यास सुरवात झाली. नोटबंदीमुळे कूलर तयार करण्यासाठी लागणारा पत्रा, अँगल, जाळी, पाण्याची मोटार, हवेची मोटार आणि घासमध्ये सरासरी दहा ते 25 टक्‍के वाढ झाली. नोटबंदीमुळे उधारीवर मिळणारा कच्चा माल रोख पैसे देऊन घ्यावा लागतोय. त्यामुळे सर्व उत्पादकांनी अतिरिक्‍त उत्पादन टाळलेले आहे. दरवर्षी साधारणत: तीनशे ते चारशे कूलर तयार झालेले असतात; मात्र यंदा केवळ पन्नासच्या आसपास तयार कूलर आहेत.
 

साठ ते ऐंशी जणांचा रोजगार गेला
एक कूलर तयार करण्यासाठी साधारणत: वेल्डर, पत्रा कारागीर, पेंटर, घास लावणारा, फिटिंग, विक्री करणारा आणि दोन मदतनीसासह सातजण लागतात. नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या महागाईमुळे उत्पादकांनी सरासरी दोन ते तीन जणांना कामावरून कमी करून पाच जणांवरच व्यवसाय सांभाळण्याचे ठरविले. मोतीकारंजा भागात वीस उत्पादकांकडून तब्बल साठ ते ऐंशी जणांना रोजगाराला मुकावे लागले. दरवर्षी एक दुकानदार सरासरी तीनशे ते चारशे कूलरची विक्री करतो. यंदा कूलर तयार नसल्याने किती कूलर तयार होऊन विक्री होतील, याबाबत शंका व्यक्‍त होत आहे.

असे महागले दर
लागणारा कच्चा माल.... 2016 चे दर.... 2017 चे दर
टीन.... 55 रुपये/किलो.... 65 रुपये/किलो
अँगल.... 40 ते 50 रुपये/किलो.... 55 रुपये/किलो
जाळी.... 55 ते 60 रुपये किलो.... 65 रुपये/किलो
पाण्याची मोटार.... 150 रुपये/नग.... 200 रुपये/नग
हवेची मोटार.... 300 रुपये/नग.... 350 ते 400 रुपये/नग

Web Title: noteban effect : desert cooler prices hiked